डासांनी थैमान घातल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. महापालिका लक्ष देत नाही व नगरसेवक फिरकत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. डासांच्या त्रासाने वैतागलेल्या काळेवाडीतील एका ज्येष्ठ नागरिकाने घरात मारलेल्या डासांनी भरलेली एक पुडीच आपल्या प्रभागातील नगरसेविकेला घरी नेऊन देण्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर, या नगरसेविकेने आरोग्य विभागाला चांगलेच फैलावर घेतले.
शहरातील सगळ्याच भागात विशेषत: नदीकाठच्या परिसरात डासांचे थैमान असून नागरिक त्रस्त आहेत. काळेवाडी गावठाणात राहणाऱ्या अशाच एका त्रस्त ज्येष्ठ नागरिकाने डासांपासून होणारा त्रास लक्षात आणून देण्यासाठी घरातील डास मारले व ते एका पुडीत भरले. स्थानिक नगरसेविका नीता पाडाळे यांच्या घरी ते गेले व त्यांना ती पुडी दिली. याखेरीज, आपण राहात असलेल्या भागातील डासांचा त्रास त्यांनी तीव्र शब्दात व्यक्त केला. ती पुडी घेऊन पाडाळे महापालिकेत आल्या. स्थायी समिती सदस्य असल्याने त्यांनी हा विषय समितीच्या बैठकीत उपस्थित केला. या विषयावरून त्यांनी प्रशासनास फैलावर घेतले. मात्र, एकही वैद्यकीय आरोग्य अधिकारी उत्तर देण्यासाठी उपस्थित नव्हता. त्यामुळे पाडाळे यांनी आयुक्तांकडे दाद मागितली. आयुक्तांनी वैयक्तिक लक्ष घालण्याची ग्वाही दिली. मात्र, अजूनही परिस्थिती तशीच असल्याचे पाडाळे यांचे म्हणणे आहे.
पाडाळे म्हणाल्या की, काळेवाडीत प्रचंड डास आहेत. नदीत मोठय़ा प्रमाणात जलपर्णी आहेत. त्या काढल्याशिवाय डास कमी होणार नाहीत. याविषयी पर्यावरण विभाग काही करत नाही. वारंवार विनंती करूनही प्रभागात फवारणी झाली नाही. त्यामुळे स्वत: भाडे भरून धुराची गाडी फिरवली, अशी व्यथा त्यांनी मांडली.    

Story img Loader