अखिल भारतीय सत्यशोधक समाज, सत्यशोधकी साहित्य व संशोधन परिषदेच्या वतीने आठवे सत्यशोधक साहित्य संमेलन शुक्रवारी (दि. २२) व शनिवारी आयोजित करण्यात आले आहे.
कायमखानी फंक्शन हॉलमध्ये होणाऱ्या या संमेलनाच्या मंचाला क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी विचारमंच, सावित्रीबाई फुले संमेलन मंडप असे नाव, तर मुख्य प्रवेशद्वाराला आद्य मुस्लिम सत्यशोधक शिक्षिका फातिमा शेख यांचे नाव देण्यात येणार आहे. डॉ. संभाजी खराट संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
शुक्रवारी सकाळी १० वाजता डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर दुपारी ‘समग्र परिवर्तनात सत्यशोधकी साहित्याचे योगदान’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. अध्यक्षस्थानी प्रा. उगले असतील. परिसंवादात डॉ. रावसाहेब ढवळे, डॉ. अजित नराफ, डॉ. गोविंद काळे, जयसिंग वाघ सहभागी होणार आहेत. ‘सत्यशोधकी लेखक रा. ना. चव्हाण’ या विषयावर डॉ. सुनीलकुमार कुरणे, तर डॉ. भरत देशमुख ‘सत्यशोधकी जलसाकार भीमराव महामुनी’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. साहित्यिक डॉ. आनंद पाटील यांची प्रा. रामप्रसाद तौर, डॉ. मा. मा. जाधव, प्रा. श्याम मुंडे हे मुलाखत घेतील. रात्री ८.३० वाजता डॉ. वृषाली रणधीर यांचा ‘मी सावित्री जोतिबा फुले बोलते’ हा एकपात्री प्रयोग होईल. या प्रयोगानंतर ज्येष्ठ कवी प्रा. फ. म. शहािजदे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे.
शनिवारी (दि. २३) सकाळी ‘सत्यशोधकी साहित्यातील स्त्रीप्रतिमा’ या विषयावर प्रा. प्रतिमा परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादात प्रा. नूतन माळवी, अ‍ॅड. सुभाष निकम, प्रा. सतीश जामोदकर, डॉ. जयश्री जाधव सहभागी होणार आहेत. प्रा. एस. बी. जाधव यांच्या अध्यक्षेखाली ‘कर्जबळी शेतकऱ्यांचे मराठी साहित्यातील दर्शन : सत्यशोधकी दृिष्टकोनातून’ या विषयावरील परिसंवादात किशोर ढमाले, धनाजी गुरव, प्रा. अर्जुन जाधव सहभागी होणार आहेत.
ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांच्या उपस्थितीत आठव्या सत्यशोधकी साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे. संमेलनात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ. श्रीराम गुंदेकर, प्रा. एस. व्ही. जाधव, प्राचार्य पी. जी. भिसे यांनी केले आहे.

Story img Loader