रात्रंदिवस कष्ट करून स्वत:च्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या सामान्य कामगाराला केंद्रबिंदू मानून, राजकारण बाजूला ठेवून सोलापूरचा विकास करण्यासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
सोलापूर महापालिकेच्या अशोक चौकातील भावनाऋषी प्रसूतिगृहाचे नूतनीकरण तथा अद्ययावत यंत्रसामग्रीचे लोकार्पण आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. महापौर अलका राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी खासदार धर्मण्णा सादूल, उपमहापौर हारून सय्यद, पालिका आयुक्त अजय सावरीकर आदी उपस्थित होते. पालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ. जयंती आडके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, स्थानिक नगरसेवक कोण आहे, याचा विचार न करता भावनाऋषी प्रसूतिगृहात भरीव सुधारणा होण्याबाबत आपण महापालिकेकडे आग्रह धरला होता. त्यानुसार हे काम पूर्ण झाले. कष्टकऱ्यांची वसाहत असलेल्या अशोक चौक परिसरात भावनाऋषी प्रसूतिगृहात अद्ययावत यंत्रसामग्री उपलब्ध झाल्याने त्याचा लाभ स्थानिक गोरगरीब रुग्णांना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी महापौर अलका राठोड यांच्यासह पालिका आरोग्य समितीचे सभापती राजकुमार हंचाटे आदींची भाषणे झाली.
 

Story img Loader