ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले याप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. दरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत १६ ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र मंत्री पाटील यांच्या आश्वासनानंतर मोर्चा रद्द करण्यात आल्याची माहिती डॉ. मानसिंगराव जगताप यांनी दिली. मंत्री पाटील म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान फक्त भारतातच होतो. शासनाने ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना एसटी, विमान, के.एम.टी प्रवासात, बँकेत सवलत दिली आहे. वृद्धांसाठी वृद्धापकाळ धोरणाची भूमिका राज्य व केंद्र शासनाने घेतली आहे. तसेच ६० ते ७०, ७० ते ८० व ८० ते त्यावर असे तीन टप्प्यात धोरण करण्यात येणार आहे.
ज्येष्ठांची संख्या वाढली असल्याने त्यांच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी पोलीस स्टेशनला ज्येष्ठ नागरिकांची यादी देण्यात येणार आहे. २० ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर येत असून यावेळी त्यांची ज्येष्ठ नागरिकांच्या शिष्टमंडळाशी भेट घडविण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवाचा उपयोग समाजासाठी करावा यातून स्त्रीभ्रूण हत्या, गुटखा बंदी, मावा बंदीसाठी प्रयत्न करावा तसेच मुलींसाठी व्याख्याने घ्यावीत, असे आवाहन करून मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून भूमिका मांडताना ज्येष्ठ नागरिकांनी १६ तारखेचा मोर्चा रद्द करावा, अशी विनंती केली व यापुढेही ज्येष्ठांच्या पाठिशी कायमपणे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ज्येष्ठ नागरिकांच्या शिष्टमंडळाच्या वतीने डॉ.मानसिंगराव जगताप यांनी १६ तारखेचा मोर्चा रद्द केल्याचे जाहीर केले. यावेळी बापूसाहेब देशपांडे यांच्यासह शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा