आगामी निवडणुकांतील यशासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळीत चांगला समन्वय घडवून राज्यातील आघाडीची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी दिली.
माजी मुख्यमंत्री चव्हाण हे एका कौटुंबिक सोहळ्यानिमित्त रविवारी सकाळी परभणीत आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. आपला दौरा हा खासगी असला तरी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींच्या, पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. राज्यातील आघाडी सरकारला पोषक वातावरण असून आघाडीची ही ताकद येत्या निवडणुकांत दिसून येण्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेसच्या नेतेमंडळींत समन्वय वाढावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे ते म्हणाले. प्रत्येक जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसच्या नेतेमंडळींना एकत्र येऊन निवडणुकांसाठी आतापासून कामाला लागावे, त्यासाठी त्यांच्यात समन्वयाचे वातावरण चच्रेने निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यातून आघाडी सरकारला निवडणुकांत मोठे यश मिळेल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, बाबाजानी दुर्राणी, महापौर प्रताप देशमुख यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, माजी आमदार कुंडलीक नागरे, मनपाचे विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सिलींग कायद्याबाबत चव्हाण म्हणाले, आघाडी सरकारने सिलींग कायद्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही वा तसा कायदा राज्यात अमलात आणण्याबाबत दुजोराही दिलेला नाही.
आनंद भरोसे व शिवाजी भरोसे यांनी त्यांच्या निवासस्थानी चव्हाण यांचा सत्कार केला. यावेळी आमदार अमर राजूरकर, ओमप्रकाश पोकर्णा, नांदेड जि. प.चे अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, महापौर अब्दुल सत्तार यांच्यासह सिद्धार्थ हत्तीअंबीरे, डॉ. विवेक नावंदर, शाम खोबे, माजी नगराध्यक्ष जयश्री खोबे, भावना नखाते, अनिल नखाते, विनय बाठिया, राम आरगडे, गफार मास्टर, बंडू पाचिलग आदी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Try of coordination between two congress for election success explanation of former cm chavan