गेल्या वर्षभरात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. राजकारणाचा अनुभव नव्हता. नव्याने महापालिका झाल्यामुळे अधिकाऱ्यांनाही नियम जाणून घ्यायचे होते. विलासराव देशमुख यांचे अकाली निधन झाले. या धक्क्यातून सावरायला वेळ लागला. बघता बघता वर्ष संपले. अडचणी भरपूर आहेत. त्यावर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे मत महापौर स्मिता खानापुरे यांनी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार बैठकीत व्यक्त केले.
उपमहापौर सुरेश पवार, स्थायी समिती सभापती अॅड. समद पटेल, बांधकाम सभापती राम कोंबडे, पाणीपुरवठा सभापती डॉ. रूपाली साळुंके, शिक्षण सभापती रेखा नावंदर, महिला व बालकल्याण सभापती केशरबाई महापुरे आदी या वेळी उपस्थित होते. कचऱ्याचा प्रश्न लातूरकरांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळय़ाचा ठरला आहे. आपण कारभार हाती घेतल्यानंतर पैसे थकीत असल्यामुळे ठेकेदाराने कचरा उचलण्याचे काम अचानक थांबवले. महापालिकेने स्वत:च्या ताकदीवर कचरा गोळा करण्याचे ठरवले. त्यातून दरमहा १० लाख रुपयांची बचत झाली. कचरा गोळा करायला सुरू केल्यानंतर कचरा टाकण्यासाठीच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला. या बरोबरच कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा गतिमान करण्यावरही भर दिला जातो आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नव्याने निविदा मागविल्या आहेत. लातूरकरांना सुसहय़ होईल अशी व्यवस्था लवकरच उभी राहील, असे खानापुरे म्हणाल्या.
गेल्या वर्षभरात कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन दिले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे देणे चुकते केले. शहरातील रस्त्यावरील पथदिवे वीजबिल न भरल्यामुळे बंद होते, ते सुरू केले. अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकरांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे ३० मे रोजी अनावरण होत आहे. मनपाच्या शाळेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती असल्यास दररोज २ रुपये हजेरीभत्ता दिला जाणार आहे. महिलांच्या नावे असलेल्या मालमत्तांना १० टक्के करसवलत, तर जलपुनर्भरण करणाऱ्यांना ५ टक्के सवलत दिली जाणार आहे. नगरसेवकांच्या आरोग्यासाठी ७५ लाख, वॉर्डासाठी ५ लाख, तर दुर्धर आजारासाठी २ कोटींचा निधी राखीव ठेवला आहे.  मनपा शाळेतील शंभर विद्यार्थ्यांना दरवर्षी एमएससीआयटीचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे आदी माहिती त्यांनी दिली.
डॉ. जनार्दन वाघमारे नगराध्यक्ष असताना खतनिर्मिती प्रकल्प सुरू झाला. तेव्हा तयार झालेले खत विक्रीयोग्य नसल्यामुळे पुन्हा त्याची निर्मिती करता आली नाही. आता नव्याने खतनिर्मिती करून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्याचा अहवाल प्राप्त होताच मोठय़ा प्रमाणात खतनिर्मिती केली जाईल, असे त्या म्हणाल्या. अतिक्रमण, अवैध बांधकाम, एलबीटी, फेरीवाल्यांचा प्रश्न, प्लास्टिक कचरा, डिझेल घोटाळा यासंबंधी महापौरांवर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. महापालिका प्रश्नांसंबंधी गंभीर आहे व प्रश्न सोडविण्यास प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत, असे उत्तर देऊन त्यांनी सुटका करून घेतली.

Story img Loader