बसस्थानकाजवळील अंबिका पान कॉर्नर व राजू अलघ यांच्या भेळीचे दुकान फोडण्याचा प्रयत्न भुरटय़ा चोरटय़ांनी केला. मात्र याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार नोंदविलेली नाही.
एसटी बसस्थानकाच्या कॉर्नरला असलेल्या जगदीश पुंडलिक सानप यांचे अंबिका पान कॉर्नर या लोखंडी टपरीचे शटरचे कुलूप तोडून पत्रा वाकवून चोरीचा प्रयत्न झाला. मात्र आतील बाजूस दुहेरी पत्रा असल्याने चोरटय़ांना आत प्रवेश करता आला नाही. तर राजू कृपालशेठ अलघ यांच्या भेळीच्या दुकानाची कुलपे तोडण्यात आली. येथेही आत प्रवेश करता आला नाही. बसस्थानक परिसरात रात्रभर वर्दळ असते. पोलिसांची गस्तही असते. तरीही चोरटय़ांनी ही दुकाने फोडण्याचा प्रयत्न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. दुकाने फोडण्यास अपयश आल्याने जवळील हत्यारेही तेथेच टाकून चोरटय़ांनी पलायन केले.
पाच लाखांची तार चोरली
तालुक्यातील माळेवाडी व उंदिरगाव शिवारातील महावीतरण वीज कंपनीची सुमारे ४ लाख ७५ हजार रुपये किमतीची अॅल्युमिनियमच्या तारा अज्ञात चोरटय़ांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात महावितरणचे कर्मचारी रोहीत राजेश हाडपे यांनी फिर्याद दिली असून, महावितरण कंपनीचे माळेवाडी उंदिरगाव शिवारातील १.४८ किलोमीटर लांबीची अॅल्यमिनियम तार व कंडक्टर २० मे च्या रात्री अज्ञात चोरटय़ांनी चोरुन नेली. ही तार व कंडक्टरची किंमत ४ लाख ७५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विद्युत कायदा कलम १३६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामीण भागात डिपी ऑइल व कॉपर वायर चोरुन नेण्याचे प्रकार घडत असत आता मात्र थेट अॅल्युमिनियमची वीजवाहक तारच नेण्याचा प्रकार घडल्याने ग्रामीण भागात चोरटय़ांचा सुळसुळाट सुरु असल्याचे स्पष्ट होते. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशन कर्मचारी तपास करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा