केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक सूचीमध्ये जैन धर्माचा समावेश करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केले. कुंथुगिरी या तीर्थक्षेत्री भक्तगणांची संख्या वाढत असल्याने येथे शासनाच्या वतीने यात्रीनिवास बांधण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
कुंथुगिरी (ता.हातकणंगले) येथे सम्मेदाचल पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत येथे साडेतीन एकर पर्वतराजीमध्ये २४ तीर्थनकर मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. त्याचे लोकार्पन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार राजू शेट्टी तसेच जनाधिपती कुंथुसागर महाराज, आचार्य देवनंदी महाराज, आचार्य गुणधरनंदी महाराज, योगगुरू बाबा रामदेव यांची प्रमुख उपस्थिती होती.
जैन धर्माला केंद्र शासनाने अल्पसंख्याक दर्जा द्यावा, अशी मागणी संयोजन समितीचे अध्यक्ष आर.के.जैन यांनी केली होती. त्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, महाराष्ट्र शासनाने अल्पसंख्याक विभागाची या अगोदरच निर्मिती केली आहे. अल्पभाषिकांचे अधिकार व त्यांचे संरक्षण करण्यासाठी अल्पसंख्याक विभाग कार्यरत आहे. असेच कार्य राष्ट्रीय पातळीवर व्हावे यापेक्षा योग्य आहे. याकरिता अल्पसंख्याक विभागाच्या मंत्र्यांशी चर्चा करून केंद्रस्तरावर निश्चितपणे प्रयत्न केले जातील. बिहारमधील सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्राप्रमाणे कुंथुगिरी तीर्थक्षेत्रही जैन धर्मियांचे प्रमुख तीर्थक्षेत्र बनेल, असा उल्लेख करून मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, या तीर्थक्षेत्राची वाढती गती पाहता येथे भौतिक सुविधांची गरज आहे. राज्य शासन येथे यात्रीनिवास होण्यासाठी प्रयत्नशील राहील. रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधाही पुरविल्या जातील. जैन धर्माच्या विचाराचा प्रसार व प्रचार करण्यासाठी हे तीर्थक्षेत्र अग्रभागी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अंहिसा, निग्रह, आत्मशुध्दी, त्याग या तत्त्वांच्या आधारे जैन धर्माचे विचार अजूनही टिकून राहिलेले आहेत, असा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी जैन तत्त्वज्ञानाचा व जैन धर्मियांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले, भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये जैन धर्मियांचा मोठा वाटा आहे. व्यापाराबरोबरच जात-धर्मातसुध्दा हा समाज आघाडीवर आहे. देशात नानाविध समस्या असताना भ.महावीरांच्या जैन तत्त्वज्ञानातून देशाला ऊर्जा मिळेल.
वनमंत्री डॉ.पतंगराव कदम यांनी कुंथुगिरी पर्वतावर तीर्थनकरांच्या मूर्ती साकारण्यासाठी निर्माण झालेल्या कायदेशीर अडचणी आणि त्या सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न यांची माहिती दिली. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या तीर्थक्षेत्री नागरी सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासन सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली. खासदार शेट्टी यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांचे पंतप्रधानांशी निकटचे संबंध असल्याने त्यांनी जैन धर्मियांना अल्पसंख्याक दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
स्वागताध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी कुंथुगिरी तीर्थक्षेत्राच्या प्रगतीचा आढावा घेतला. कार्यक्रमास माजी मंत्री प्रकाश आवाडे,आमदार डॉ.सुजित मिणचेकर, आमदार संजय पाटील, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी.एन.पाटील, जिल्हाधिकारी राजाराम माने आदी उपस्थित होते. ओमजी पाटणी यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र मोरे यांनी आभार मानले.