डॉक्टर पतीने आपल्या डॉक्टर पत्नीवर होंडा सिटी घालून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे घडली. डॉ. जयश्री माने असे जखमीचे नाव आहे.
नातेपुते येथील डॉ. प्रशांत गांधी यांच्या दवाखान्यात रुग्णांच्या तपासणीसाठी डॉ. जयश्री माने गेल्या होत्या. तेथून परत दहिगाव रस्त्याने पायी चालत घराकडे येत असताना त्यांचे पती डॉ. बाबासाहेब माने यांनी त्यांच्याकडील होंडा सिटी कारने पाठीमागून धडक देऊन डॉ. जयश्री माने यांना गंभीर जखमी केले व नंतर पसार झाले. पत्नीचा खून करण्याच्या उद्देशानेच त्यांनी हे कृत्य केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. डॉ. जयश्री माने यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर पुळूज येथील सन्मती हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत.
    डॉ. जयश्री माने व डॉ. बाबासाहेब माने यांना बारा वर्षांची एक मुलगी आहे. चार वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब माने यांनी दुसरा विवाह केला होता. त्या वेळी त्यांच्याविरोधात डॉ. जयश्री यांनी नातेपुते पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यात डॉ. माने यांना अटकही झाली होती. आपल्या पत्नीच्या अंगावर कार घालून तिचा खून करण्याचा हेतू स्पष्ट झाला नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दोघा पोलिसांना मारहाण
सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या दोन पोलीस शिपायांना गाडीचा कट मारल्याच्या कारणावरुन पुण्यातील तरुणांनी बेदम मारहाण केली. शहर पोलीस आयुक्तालयाजवळच हा प्रकार घडला. याप्रकरणी पुण्यातील २६ तरुणांना सदर बझार पोलिसांनी अटक केली. या तरुणांच्या ताब्यातून स्कॉíपओ, फॉच्र्युनर आदी चार वाहने जप्त करण्यात आली आहेत. शहर गुन्हे शाखेतील पोलीस शिपाई वसीम इसाक शेख व इब्राहिम शेख हे दोघे विजापूर नाका पोलीस ठाण्यातील काम संपवून गुन्हे शाखेकडे जात असताना पोलीस आयुक्तालयाजवळ गाडी कट मारल्याच्या कारणावरुन या दोघा पोलिसांना तरुणांच्या जमावाने बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अमर नंदकुमार चव्हाण (वय १९), विपूल राजेंद्र जोरी (वय १८ रा. मालखेडे, ता. हवेली, जि. पुणे), किरण मारुती शेलार (वय २७ रा. सिंहगड रोड, नरेगाव, पुणे), सुधीर संतू खोले (वय २४, रा. धायरी, पुणे) आदी तरुणांना अटक करुन न्यायालयासमोर उभे केले असता सर्वाना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.