सत्ताधारी शिवसेना-भाजपला घाई
अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालून त्यांच्यावर कारवाई करण्यात टाळाटाळ केल्याप्रकरणी गेल्या वर्षी बडतर्फ करण्यात आलेले कल्याण डोंबिवली महापालिकेचे प्रभारी शहर अभियंता पी. के. उगले यांना शहर अभियंता पदावर बढती देण्याचा प्रस्ताव येत्या ११ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आणण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर करावा यासाठी सत्ताधारी शिवसेना-भाजपने कंबर कसली असून बडतर्फ अधिकाऱ्याच्या  बढतीच्या प्रस्तावामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी यापूर्वी उगले यांच्या बढतीचा प्रस्ताव तब्बल तीन वेळा राज्यस्तरावर फेटाळून लावला आहे. कल्याण डोंबिवली पालिकेत बांधकामांचे ढिसाळ नियोजन होत असल्याने आयुक्त सोनवणे यांनी शासनाकडून मागणी करून प्रतिनियुक्तीवर शहर अभियंता मागविला आहे. अधीक्षक अभियंता शिवराज जाधव हे महापालिकेत कार्यरत आहेत. त्यामुळे उगले यांना शहर अभियंतापदी बसविण्याची नेमकी घाई कोणाला झाली, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. गेल्या वर्षी उगले यांनी बडतर्फ करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत करण्यात आला. मात्र, उगले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन या बडतर्फीला स्थगिती मिळवली. हे प्रकरण न्यायालयात असताना व शासनाची मंजुरी नसताना आयुक्तांनी हा प्रस्ताव कसा आणला याविषयी उलटसुलट चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
पी. के. उगले यांचा विषय न्यायप्रविष्ट आहे. अनेक कायदेशीर बाबी या विषयात आहेत. त्यामुळे कायदेशीर बाबी तपासून याविषयी मनसेची भूमिका स्पष्ट केली जाईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी पत्रकारांना दिली. तर शिवसेना-भाजपच्या सभागृहातील संख्याबळानुसार हा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल, अशी माहिती उपमहापौर बुधाराम सरनौबत यांनी वृत्तान्तला दिली. आयुक्त रामनाथ सोनवणे यांनीच शहर अभियंतापदी जाधव यांना प्रतिनियुक्तीवर आणले. मग त्याच जाधव यांना परत पाठविण्याच्या विषयावर सोनवणे मूग गिळून का आहेत, असा सवालही त्यांनी केला.