माळीवाडा बसस्थानकात झालेल्या अंधाराचा गैरफायदा घेत लहान मुलीला पळवण्याचा एकाचा प्रयत्न काही नागरिकांमुळे अयशस्वी झाला. नागरिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. बुधवारी रात्री हा प्रकार घडला. पोलिसांनी लगेचच त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
शिवकुमार महेशकुमार निगम (वय, ५०, राहणार भिलवाडा, राजस्थान) असे यातील आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला आज १ दिवसाची पोलीस कोठडी दिली. अनंत जाधव या मजुराच्या ३ वर्षांच्या लहान मुलीला पळवण्याचा शिवकुमारचा प्रयत्न होता. जाधव तोंडोली (ता. पाथर्डी) येथील विलास राठोड यांच्याकडे मजूर म्हणून कामाला आहेत. ते ही मुलगी व एक मुलगा यांना घेऊन सुधागड (जि. रायगड) येथे आईवडिलांकडे गेले होते.
बुधवारी रात्री ८ वाजता ते माळीवाडा स्थानकात उतरले. त्यांच्याबरोबर दोन्ही मुलेही होती. त्याचवेळी विलास राठोड हेही तिथे आले होते. त्यांच्याबरोबर जाधव बोलत असतानाच स्थानकातील दिवे गेले. त्यावेळी अंधारातच शिवकुमार याने स्थानकात खाली खेळत असलेल्या मुलीला उचलले व पळून जाऊ लागला. काही नागरिकांनी त्याला पाहिले व धरले. दरम्यान जाधव यांचेही लक्ष मुलीकडे गेले. त्यांनीही शिवकुमारला पकडले. काय प्रकार झाला हे लक्षात आल्यावर त्याला चोप देत स्थानक चौकीतील पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
छोटय़ा मुलीला पळवण्याचा प्रयत्न
माळीवाडा बसस्थानकात झालेल्या अंधाराचा गैरफायदा घेत लहान मुलीला पळवण्याचा एकाचा प्रयत्न काही नागरिकांमुळे अयशस्वी झाला.
First published on: 31-05-2013 at 01:49 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trying to kidnap 3 year old girl