पंढरपूर येथील नवीन बसस्थानकात गावाकडे जाण्यास उभ्या असलेल्या सतरा वर्षांच्या युवतीला बनावट पिस्तुलाचा धाक दाखवून ओमनी गाडीत घालून पळवून नेत असताना मुलीने ओरड केल्याने रिक्षाचालक, नागरिकांनी एकाला पकडले तर तिघे गाडी घेऊन पसार झाले. हा प्रकार सोमवारी दुपारी १२.३० ते १च्या दरम्यान घडला.
पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांनी सांगितले, की पंढरपूर तालुक्यातील घोंडेवाडी येथील रहिवासी असलेल्या या मुलीस अप्पा धोंडिबा मोरे (रा. लोटेवाडी, ता. सांगोला, वय २३) याने लग्नाची मागणी घातली होती. परंतु अप्पा मोरे हा वडाप गाडीवर चालक असल्याने मुलीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिला होता. तो राग त्याच्या मनात होता.
यामुळे तो मुलीच्या पाळतीवर होता. दि. १८ रोजी ही युवती घोंडेवाडी येथून औषधोपचार करता आली होती. दरम्यान, अप्पा मोरे हा ओमनी (क्र. एम. एच. ४५ ए, ९३६३) गाडी घेऊन साथीदार तात्या सावंत (रा. गिरझणी, ता. माळशिरस) गाडीचा मालक बापूराव गायकवाड (रा. गिरझणी, ता. माळशिरस) व बाबूराव सावंत (रा. सदुभाऊ चौक, अकलूज) यांच्यासह नवीन बसस्थानकात गाडी घेऊन चकरा मारत होते.
दरम्यान, ही युवती घोंडेवाडीकडे जाण्यासाठी बसस्थानकात येताच अप्पा मोरे याने गाडीचे दार उघडे ठेवून हातात एअरगन व चाकू घेऊन त्या मुलीस ओढत नेले. तिने आरडाओरडा चालू केला. तेवढय़ात देढे नावाच्या डॉक्टरांनी भेदरलेली मुलगी पाहून तिला सोडवण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना मारहाण करण्यात आली. तेवढय़ात नागरिक अन्  रिक्षाचालकांनी गराडा घालताच सर्वावर मोरे याने एअरगन रोखली.
मागून रिक्षाचालक अमर गायकवाड, खुशाल साळ यांनी अप्पा मोरेला पकडले. तेवढय़ात बसस्थानकात गस्तीवर असलेले पोलीस सय्यद विनय चौगुले आले. त्यांनी अप्पा मोरे यास ताब्यात घेतले. घटनास्थळी प्रशांत कदम व पोलीस निरीक्षक प्रकाश सातपुतेही दाखल झाले. त्यांनी अप्पा यास पोलिसी खाक्या दाखवताच लग्नासाठी मुलीस पळवून नेत होतो असे सांगितले. अप्पा मोरे याचे तीन साथीदार गाडीसह फरार असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या फिल्मी स्टाईल प्रकाराने बसस्थानक हादरून गेले होते. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक सातपुते करीत आहेत.