एकीकडे माणूस चंद्रावर जाऊन येऊन मंगळावर जायचे नियोजन करीत असताना समाजात नरबळी, डाकीण प्रथा, भोंदूगिरी वाढत आहे. ही गोष्ट समाजाला लाजिरवाणी आहे. समाज इतका अंधश्रध्दाळू का बनत आहे याचे कोडे आम्हास उलगडत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जादूटोणा विरोधी कायदा मंजूर होण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मी देखील याचकरिता मंत्रिमंडळाची बैठक घेईन, असे प्रतिपादन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती व पुरोगामी संघटनांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. कायदा संमत होण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना द्यावयाचे व्यक्तीगत निवेदन घेण्याच्या मोहिमेस आज मुस्लिम बोर्डिंग येथून सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहूमहाराज होते.
यावेळी कॉ. गोविंद पानसरे म्हणाले, तब्बल वीस वर्षे जादूटोणाविरोधी कायदा संमत होत नाही ही गोष्ट पुरोगामी महाराष्ट्राला भूषणावह नाही. त्यामुळे खरंच महाराष्ट्र पुरोगामी आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. डॉ.जयसिंगराव पवार यांनी शाहूमहाराजांच्या अंधश्रध्दा विरोधी दृष्टिकोनाचे दाखले देऊन राजर्षी शाहूंचा पुरोगामी कोल्हापूर हा कायदा मंजूर होण्यासाठी प्रयत्न करेन असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास डॉ.नरेंद्र दाभोळकर, कॉ. दिलीप पवार, के.डी.खुर्द, टी.आर.शिंदे, प्राचार्य हेरवाडे, गणी आजरेकर, कादर मलबारी, भीमराव अतिग्रे, बजरंग लोणारी, किरण कटके, रमेश वडणगेकर, नसिमा अपराध आदींसह पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश फोंडे यांनी केले. निवेदनाचे वाचन शिवाजी माळी, सूत्रसंचालन कृष्णात कोरे तर आभार उमेश सूर्यवंशी यांनी मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा