पदपथांवरील झोपडय़ा आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्याच्या फंदात पडण्यापेक्षा हे अडथळे निर्माणच होऊ नये म्हणून पदपथच अरुंद करण्याचा तुघलकी उपाय मुंबई महापालिकेने शोधला आहे. आणि संतापजनक बाब म्हणजे पदपथ अरुंद होऊनही झोपडय़ा आणि फेरीवाले विनाव्यत्यय पदपथ अडवतच आहेत. मधल्यामध्ये पायी चालणाऱ्या नागरिकांवर संक्रांत ओढवली आहे.
पदपथांवरील झोपडय़ा आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण ही सगळीकडचीच जटिल समस्या आहे. याला आळा बसावा म्हणून पदपथांचीच रुंदी कमी करण्याची शिफारस उच्चाधिकार समितीने पालिकेला केली आहे. पदपथाची रुंदी कमी केल्यामुळे तेथे झोपडय़ा उभारण्यास जागाच मिळणार नाही आणि वाहनांना रहदारीसाठी रस्ताही मोठा होईल, असा युक्तिवाद त्यासाठी करण्यात आला.
मात्र मूळ मुद्दा अतिक्रमणे हटविणे हाच आहे. विद्यमान पदपथांवरील अतिक्रमणे हटविणे याला पदपथ अरुंद करणे हे उत्तर कसे काय असू शकते, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. मात्र या योजनेला विरोध होऊ नये म्हणून अरुंद केलेले पदपथ नीटनेटके व्हावेत, वृद्धांना अथवा अपंगांच्या व्हीलचेअरसुद्धा त्यावरून विनाअडथळा जातील अशा प्रकारे पदपथांना उतार देणे आदी प्रकार केले जात आहेत.
पालिकेने मुंबईतील काही भागातील पदपथांवरील झोपडय़ा जमीनदोस्त करून त्याची रुंदी कमी करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र रुंदी कमी केल्यानंतरही काही काळातच पाडलेल्या झोपडय़ा पुन्हा उभ्या राहात आहेत. त्यामुळे मूळ प्रश्न ‘जैसे थे’च राहिला आहे. उलटपक्षी काही ठिकाणी आधी मोकळे असलेले पदपथ अरुंद झाल्यामुळे पादचाऱ्यांना चालणे मुश्किल झाले आहे.
झोपडय़ांचे साम्राज्य असलेल्या आर. ए. सिनकर मार्गावरील रुंद असलेला पदपथ कमी करून पाच फूट करण्यात आला. मात्र हे काम पूर्ण होताच काही दिवसांनी या पदपथावर पुन्हा झोपडय़ा उभ्या राहिल्या. त्यामुळे ही योजना अपयशी ठरल्याची कबुली पालिकेच्याच अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.
वास्तविक, इंडियन रोड काँग्रेसच्या (आयआरसी) निकषांनुसार पदपथांची रुंदी १.६ मीटर, आणि उंची ६ ते ८ इंच असायला हवी. मात्र मुंबईमध्ये या निकषांनाच हरताळ फासण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत पदपथांमध्ये समानता दिसून येत नाही. काही ठिकाणी एक ते दीड फूट तर काही ठिकाणी अवघे चार ते पाच इंच उंचीचे पदपथ दृष्टीस पडतात. तसेच काही विभागांमध्ये पदपथांची रुंदी केवळ एक ते दीड फूट असल्याचेही दृष्टीस पडत आहे. पदपथांवर केवळ झोपडपटय़ा अथवा फेरीवाल्यांनीच अतिक्रमण केले आहे असे नाही. तर अनेक विभागांतील दुकानदारांनी बाकडा, कडप्पा आणि ग्रीलच्या रूपाने पदपथांवर अतिक्रमण केले आहे. त्याकडे मात्र पालिका कानाडोळा करीत आहे.
पालिकेचा तुघलकी कारभार
पदपथांवरील झोपडय़ा आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्याच्या फंदात पडण्यापेक्षा हे अडथळे निर्माणच होऊ नये म्हणून पदपथच अरुंद करण्याचा तुघलकी उपाय मुंबई महापालिकेने शोधला आहे. आणि संतापजनक बाब म्हणजे पदपथ अरुंद होऊनही झोपडय़ा आणि फेरीवाले विनाव्यत्यय पदपथ अडवतच आहेत.
First published on: 22-02-2013 at 12:40 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tughlaki administration of municipal corporation