थकीत कर्ज एकरकमी भरण्याची हमी दिल्यामुळे नळदुर्ग येथील तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर जिल्हा बँकेकडून होणारी जप्तीची कारवाई तूर्त टळली.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तेरणा, तुळजाभवानी साखर कारखाना व भूम तालुका दूधउत्पादक संघाकडे कोटय़वधीचे कर्ज थकीत आहे. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी या संस्थांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. तेरणा कारखान्यातील मशिनरी व स्टोअर यापूर्वीच जप्त करण्यात आले. शुक्रवारी जिल्हा बँकेचे पथक तुळजाभवानी कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यास गेले होते. कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक विकास भोसले जप्त करण्यास विरोध करून २० डिसेंबरपर्यंत कारखान्याकडील थकीत कर्ज एकरकमी भरण्याचा विचार असल्याने जप्तीची कारवाई थांबवावी, असे लेखी पत्र बँकेच्या अधिकाऱ्यांना दिले त्यामुळे ही कारवाई तूर्त स्थगित करण्यात आली.
तुळजाभवानी कारखान्याची अवस्था दयनीय आहे. त्यातच जिल्हा बँक वाचविण्यासाठी प्रशासनाने वसुलीवर भर दिला. तुळजाभवानी कारखान्याकडे ४७ कोटी मुद्दल व त्यावरील व्याज ३० कोटी थकीत आहे. कारखान्याने यापैकी ४८.३१ कोटी जमा करावे, असे वारंवार बँकेने कळविले.
मात्र, कारखान्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बँकेने जप्तीची नोटीस बजावली होती. त्यानुसार आज जिल्हा बँकेचे प्राधिकृत अधिकारी आर. के. जोशी, प्रशासकीय अधिकारी ए. एन. डी. साळुंके, एस. बी. पाटील यांचे पथक कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यास गेले होते. मात्र, प्रभारी कार्यकारी संचालकांच्या आश्वासनामुळे हे पथक आल्या पावली परत निघून गेले.