शारदीय नवरात्र महोत्सवाला उद्या (शनिवारी) घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. समाधानकारक पाऊस-पाण्यामुळे यात्रेसाठी भाविकांची विक्रमी गर्दी होण्याचा अंदाज लक्षात घेऊन अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. महसूल व पोलीस प्रशासन तुळजापुरात तळ ठोकून असून, नगराध्यक्षा विद्या गंगणे यांनी दर्शनास मोठय़ा संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी नगरपालिका प्रशासनही सज्ज असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. के. एम. नागरगोजे यांच्या हस्ते मानाची घटस्थापना पूजा दुपारी १२ वाजता पारंपरिक पद्धतीने होईल. तुळजाभवानी मातेचे पुजारी, प्रशासनासह भाविकांच्या उपस्थितीत हा विधी होणार आहे. मंदिर संस्थानने कर्मचाऱ्यांना मागील महिन्यापासून रजा न देण्याबरोबरच २४ तास सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. धार्मिक विधीकाळात पारंपरिक विधी पार पाडताना गर्दी व गोंधळ होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे सक्त आदेश आहेत. मंदिरात पुजाऱ्यांना बायोमेट्रिक ओळखपत्र देण्याची प्रक्रिया अजून पूर्ण न झाल्याने नवरात्र काळात जुनी ओळखपत्रे पुजाऱ्यांना उपयोगात आणावी लागणार आहेत.
तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी या निमित्त भाविकांसाठी प्रशासनाने सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी केली. पुजारी वर्गाकडून सर्व पातळीवर सहकार्य केले जाईल, असे सांगितले.
गर्दीवर नियंत्रणाची मोठी जबाबदारी पोलीस यंत्रणेवर असेल. पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे-वालावडकर, निरीक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली साडेतीन हजार पोलीस कर्मचारी तनात राहतील. भाविकांची ने-आण करण्यास यंदा १ हजार ६०० बसगाडयांची सोय केली आहे. पालिका प्रशासनाकडून पाणीपुरवठा, शहरांतर्गत स्वच्छता, आरोग्य सुविधा, रस्ते या सारख्या नागरी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यात्राकाळात रोजंदारी कर्मचाऱ्यांची भरतीही केली गेली आहे. २४ तास नागरी सुविधा देण्यासाठी सर्व विभागप्रमुखांना सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. कामात कुचराई केल्यास संबंधितावर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.
डॉ. नागरगोजे यांनी यात्राकाळात सर्व खातेप्रमुखांनी सतर्क राहण्याबाबत पूर्वीच आदेश जारी केले आहेत. भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन रस्ते बंद केले आहेत. शहर व मंदिर परिसरात चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी आहे. लाकडी बॅरिकेटिंग व मार्ग वळविण्याची प्रक्रिया मागील दोन दिवसांपासून सुरू आहे.
मंदिरासमोर दर्शनास होणारी भाविकांची कोंडी खास तंत्राने नियंत्रित करण्याची व्यूहरचना पोलीस खात्याने केली आहे. महाद्वार चौक ते भवानीरस्ता या मार्गावरील गर्दी शहाजी राजे महाद्वारातून िनबाळकर दरवाजामाग्रे तपासणी करून होमकुंडासमोरून दर्शन मंडपात सोडली जाईल. गरज भासल्यास बीडकर तलाव माग्रेही थेट दर्शन मंडपात भाविकांना सोडण्याची व्यवस्था आहे. भाविकांना ३-४ तासांत दर्शन मिळाले पाहिजे, अशी रचना मंदिर संस्थानने केली. १२० सीसीटीव्ही कॅमेरे, खासगी १६० ते १८० सुरक्षा कर्मचाऱ्यांची फौज तनात आहे.

Story img Loader