उन्हाची काहिली वाढली की बहुतेक शहरात पाण्याची टंचाई निर्माण होत असल्यामुळे अनेकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येते. विशेषत: उन्हाळ्यात बाहेर फिरताना तहान लागल्यावर पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी तर नागरिकांना बाटलीबंद पाणी किंवा पाऊच किंवा विकत घेऊनच पाण्याचा आसरा घ्यावा लागतो. ‘पाण्याचा पैसा करण्याचा’ उद्योग गेल्या काही वर्षांत चांगलाच फोफावला आहे. बाटलीबंद पाण्याची उन्हाळ्याच्या दोन महिन्यात केवळ विदर्भात कोटय़वधी रुपयाची उलाढाल होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
उन्हाळय़ात ठरलेली पाणीटंचाई आणि हंडाभर पाणी मिळविण्यासाठी वणवण फिरणारे नागरिक, निसर्गाने अनेक ठिकाणी वरदहस्त ठेवल्याने कुठे धो-धो पाणी, तर अनेक ठिकाणी कायम पाणीटंचाई. फार पूर्वी पाण्याला मोल नव्हते. गेल्या काही वर्षांत पाणी अनमोल झाले आहे. धरणे-तलावातून साठविलेले पाण्याचा पैसा शासन शेतकरी व सर्वसामान्यांकडून वसूल करू लागले. शेतीसाठी प्रती एकराप्रमाणे तर महापालिका, नगरपालिका हे नागरिकांकडून दर युनीटप्रमाणे पाणीपट्टी घेऊन पाणी देऊ लागले. पाणीटंचाईचे सावट उभे राहताच पाण्याच्या भावात वाढ होते.
 एका िपपाला १५ ते ५० रुपये, एक टँकर ५०० ते ६०० रुपये या दराने पाणी विकले जाते. थेट विहीर किंवा धरणातील पाण्याची किंमत ही असली, तरी सार्वजनिक समारंभ व उच्च दर्जाच्या हॉटेलपासून बसस्थानक, रेल्वेस्थानक व विमानतळ या ठिकाणी बाटलीबंद पाण्याची जोरदार विक्री १२ महिने होत असते. एक लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत १५ ते २० रुपये आहे.
गेल्या काही वर्षांत शीतपेय तयार करणाऱ्या नामांकित कंपन्यांनी बाटलीबंद पाण्याची विक्री होऊ शकते, हे दाखवून दिले. आरोग्यासाठी शुद्ध पाण्याची गरज ओळखून पाणी विक्रीसाठी लहान-मोठय़ा शंभर कंपन्या बाटलीबंद पाणीविक्री करीत आहेत. विशेष शहरात, बसस्थानकावर पाणपोई असतानासुद्धा जवळ असलेल्या दुकानातून मिनरल वॉटरची बॉटल खरेदी केली जाते. बसस्थानकावर असलेल्या हॉटेलमध्ये किंवा सार्वजनिक पाणपोईवर मिळणारे पाणी शुद्धतेच्या बाबतीत जेमतेम असते.
ग्रामीण भागात तर उन्हाळय़ात बऱ्याच उपाहारगृहात ‘चहा घेतला तरच पाणी’ अशी टोकाची भूमिका असल्यामुळे सर्वसामान्याला पाणी मिळत नाही. वैतागून विकतचे पाणी घेऊन आपली तहान भागववी लागते. बाटलीबंद पाण्याचीही किती शुद्धता, यावरून मध्ये वादळ उठले होते तरी बाटलीबंद पाण्याचा खप कमी झाला नाही. बाटलीबंद पाण्यासोबतच प्लॅस्टीकच्या पाण्याचे पाऊच आले आहे.
 बाजारात ते ठोक भावात ७५ रुपयाला ५० या भागात विकत असले तरी सामान्य ग्राहकाला ते २ रुपयाला खरेदी करून तहान भागावी लागत असते. सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर सभा, मिरवणुकांमध्ये पाण्याचा पाऊच आणि बाटलीबंद पाण्याचा मोठय़ा प्रमाणात होऊ लागला आहे.
राजकीय सभांमध्ये अनेक लहान मुले या पाऊचची विक्री करीत असताना दिसतात. ग्रामीण भागात अनेक हॉटेल व बसस्थानकावर बॉटलमध्ये नळाचे पाणी भरून बर्फात ठेवतात आणि त्या बॉटलची विक्री करीत असताना दिसतात. मिळालेल्या माहितीनुसार पाण्याच्या या विक्रीत नफ्याचे प्रमाण भरपूर आहे. पर्यटनस्थळी भेट देणारे पर्यटक तसेच परप्रांतातील बहुतांश पर्यटकही बाटलीबंद पाणी पितात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा