वाहिन्यांच्या टीआरपी पद्धतीला आता रामराम करण्यात येत असून नवीन ‘टीव्हीटी’ पद्धत २०१४ या वर्षांत अमलात येणार आहे. या नवीन पद्धतीमुळे वाहिन्यांपेक्षा निर्मिती संस्था आणि निर्माते अधिक सुखावले आहेत. कारण एखादी मालिका बंद करण्यासंदर्भातील सर्व निर्णय आतापर्यंत संबंधित वाहिनीचे असायचे. एखादी मालिका सुरू असताना अचानक ती बंद करण्याचा निर्णय घेणे, मालिकेच्या वेळा बदलणे अशा अनेक गोष्टींची कल्पना निर्मिती संस्थांना न देणे हे असे अनेक प्रकार सर्रास व्हायचे. याबाबत निर्मिती संस्थेने एखादा प्रश्न विचारल्यास टीआरपी कमी आहे, असे उत्तर वाहिन्यांकडून मिळत असे. परंतु आता मात्र टीव्हीटीमुळे निर्मिती संस्थाकडे त्यांच्या मालिकेला किती प्रेक्षकवर्ग लाभलेला आहे हे समोर येणार आहे.
 यासंदर्भात बोलताना, ‘प्लेटाइम क्रिएशन्स’ या निर्मिती संस्थेचे हेमल ठक्कर म्हणाले की, ‘टीव्हीटी’मुळे प्रेक्षकांची संख्या हजारोंमध्ये कळणार असून अधिक पारदर्शक निकाल आपल्या समोर येईल. त्यामुळे आपल्या मालिकेची लोकप्रियताही लक्षात येईल. ‘टीव्हीटी’ संदर्भात संबंधित वाहिन्यांच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्त्न केला असता त्यांनी यासंदर्भात बोलण्यास नकार दिला.
दरम्यान, टीआरएआयने (टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया) याबाबत विविध उपाय सुचवले आहेत. टीआरएआयने गेली कित्येक वर्षे टीआरपीमुळे वाहिन्यांचा कसा फायदा होतो आणि त्यामुळे जाहिरातदार कसे वाढतात याचा अभ्यास केलेला आहे. टीआरएआयच्या मते, टीआरपी पद्धतीमुळे अनेकदा चांगल्या मालिका ‘वाईट टीआरपी’ या कारणामुळे बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे टीआरपी ही पद्धत चुकीची असल्याचा दावा करण्यात आला. ‘टीव्हीटी’ ही नवीन पद्धत योग्य आहे, परंतु या नवीन पद्धतीचे मोजमाप करण्याची जबाबदारी केवळ एका संस्थेकडे देण्यापेक्षा अनेक कंपन्या नेमाव्यात. भारतामध्ये टीव्ही पाहणारा प्रेक्षकवर्ग हा फार मोठय़ा प्रमाणात आहे. हा प्रेक्षकवर्ग मोजण्यासाठी खास यावर काम करणाऱ्या कंपन्या हव्यात असा आग्रह टीआरएआयने धरला आहे.  

Story img Loader