बारा बलुतेदार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, जातीचे दाखले मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करणे, विदेशी शिक्षणासाठी शासनाकडून जादा शिष्यवृत्ती मिळणे, यांसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी येथे शुक्रवारी बारा बलुतेदारांचा महामोर्चा काढण्यात येणार आहे.
शालिमार येथील बी. डी. भालेकर मैदानापासून सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरूवात होणार आहे.
नाभिक, सुतार, कुंभार, लोहार, शिंपी, साळी, गुरव, भोई, परदेशी, परीट, बेलदार, सोनार आदी उपेक्षित व दुर्लक्षित समाज घटकांना न्याय मिळावा, त्यांच्या विविध अडीअडचणींचा विचार करून ओबीसी म्हणून असलेल्या सवलतींशिवाय शासनाच्या वतीने त्यांच्या काही आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक मागण्या मान्य कराव्यात यासाठी दोन वर्षांपासून राज्यस्तरीय बारा बलुतेदार संघ प्रयत्नशील आहे.
शासन दरबारी ४१ मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांकेड राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मागण्यांमध्ये ओबीसी गॅझेटमध्ये सर्व पोटजातींचा उल्लेख करणे, नाभिक व परीट समाजाचा ‘एससी’ वर्गवारीत समावेश करावा, बारा बलुतेदार जातींना राज्य शासनाच्या आरक्षित जमिनी मिळाव्यात, कारागिरांना शासनाकडून कमी ददरात कर्ज पुरवठा मिळावा, खादी ग्रामोद्योगाकडून बारा बलुतेदारांनी घेतलेले कर्ज त्वरीत माफ करणे, बारा बलुतेदारांसाठी राजकीय व स्वंतत्र सामाजिक आरक्षण मंजूर व्हावे, आदिंचा समावेश आहे. या मोर्चात जास्तीजास्त समाजबांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक जिल्हा स्वकुळ साळी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा