येथील विमानतळ व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जागेच्या वादात अडकले असून विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचे विकासाच्या मुद्दय़ावर एकमत होणार नाही, तोपर्यंत हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प असेच अधांतरी लटकून राहणार आहेत. त्यामुळे या औद्योगिक जिल्हय़ाचे फार मोठे नुकसान होत आहे.
औद्योगिक जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपुरात वेकोलीच्या कोळसा खाणी, पाच सिमेंट कारखाने, बिल्ट, पोलाद उद्योग, महाऔष्णिक वीज केंद्र, खासगी वीज प्रकल्प व भविष्यात येऊ घातलेले वीज प्रकल्प आणि उद्योगांचा समावेश आहे. देशभरातील मोठय़ा उद्योगपतींचे अब्जावधींची गुंतवणूक असलेले उद्योग व प्रकल्प या जिल्हय़ात येत आहेत. औद्योगिक जिल्हा म्हणून विस्तार होत असतानाच येथे आधुनिक विमानतळ नाही. चंद्रपूर-नागपूर मार्गावर मोरवा विमानतळ आहे, परंतु मोरवा येथील विद्यमान धावपट्टीच्या हवाई रेंजमध्ये चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राची चिमणी येत असल्याने तिथे व्यावसायिक विमानतळ विकसित करणे तांत्रिकदृष्टय़ा शक्य होत नसल्याचे राज्य विमानतळ विकास कंपनीने स्पष्ट केले आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मूल तालुक्यातील सुशी दाबगाव येथील जागा सुचविली आहे. त्यानुसार विमानतळ विकास कंपनीने सुशी दाबगाव येथील जमिनीची पाहणी केली आहे. ही जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदार मुनगंटीवार यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, परंतु ही जागा विमानतळासाठी सोयीस्कर होणार नाही, असे उद्योगपतींसोबत अनेकांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मूल मार्गावरील लोहारा येथील जागा विमानतळासाठी सुचविली आहे.
ही जागा चंद्रपूर शहराला लागून असल्याने जिल्हय़ात येणारे मोठय़ा उद्योगांचे मालक, संचालक तसेच कार्पोरेट अधिकाऱ्यांना अधिक सोयीस्कर होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. विमानतळाच्या जागेचा वाद बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. या वादातच विमानतळ अडकले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा जागेच्या वादामुळेच अडकून पडले आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी वैद्यकीय महाविद्यालयासाठी चंद्रपूर-बल्लारपूर बायपास मार्गावर २५ एकर जागा दिली. मेडिकलचे नोडल अधिकारी डॉ. दीक्षित यांच्याकडे जमिनीची कागदपत्रेसुद्धा हस्तांतरित करण्यात आली, परंतु महापौर संगीता अमृतकर यांनी ही जागा प्रदूषित असल्याची तक्रार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
या तक्रारीची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून पुन्हा एकदा नव्याने जागेची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. नरेश पुगलिया यांनी वैद्यक महाविद्यालयासाठी दाताळा येथील म्हाडाची जागा किंवा वनराजिक महाविद्यालयाची जागा सुचवली आहे. वनराजिक महाविद्यालयाची जागा सर्व दृष्टीने सोयीस्कर असली तरी वन विभाग ही जागा देणार का? प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसांत वैद्यकीय महाविद्यालयाची जागा पाहण्यासाठी पुन्हा एक पथक येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या तरी केवळ जागेच्या वादातून वाहनतळ व वैद्यक महाविद्यालय अडकून पडले आहे. जागेचा हा वाद बघता स्थानिक लोकप्रतिनिधींनी विकासाच्या मुद्दय़ावर एकत्र येऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी सर्वसामान्य शहरवासीयांची प्रतिक्रिया आहे. प्रामुख्याने काँग्रेस व भाजपच्या लोकप्रतिनिधींमध्येच हा वाद सुरू आहे. पुगलिया यांनी म्हाडाची जागा सुचविली असताना खासदार हंसराज अहिर यांनी म्हाडाच्या जागेत सिकलसेल स्पेशल हॉस्पिटल उभारावे, अशी मागणी लावून धरली आहे. सिकलसेल रुग्णालयासाठी तिथे जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. जिल्हय़ाच्या विकासासाठी विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालय, सिकलसेल हॉस्पिटल, महिला महाविद्यालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आवश्यक आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत जागेचा वाद बाजूला ठेवून अधांतरी लटकलेले हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करावे, अशी शहरवासीयांची भावना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा