शाळकरी मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी त्या मुलीच्या आईची संमती नसताना त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तथाकथित पत्रकार, वकील, समाजसेवकाला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्यासोबत त्याच्या सहकाऱ्यावर विनयभंग व सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. बातमीची माहिती घेण्याऐवजी या पत्रकाराने पोलिसांना उलटसरशी सूचना देण्याचा खेळ ँपोलीस ठाण्यातच सुरू ठेवला होता.
खारघर येथील व्ही. एन. म्हात्रे विद्यालयातील एका अल्पवयीन विद्याíथनीवर याच विद्यालयाच्या कर्मचाऱ्याने अत्याचार केलेल्या घटनेचा पोलीस तपास करीत होते. या पीडित मुलीची आई पोलीस ठाण्यात रडत पोलिसांना घटना सांगत होती. साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. लोखंडे हे या प्रकरणाची नोंद घेत असताना तिथे आलेल्या तथाकथित पत्रकार विनोद दीपचंद गंगवाल आणि प्रकाश बोहरा या दोघांनी पीडित मुलीच्या आईचे तिची संमती नसताना छायाचित्रण (रेकॉर्डिग) सुरू केल्यामुळे या पीडित आईने या गंगवाल व बोहरा यांना छायाचित्रण नष्ट करण्याची विनंती केली होती. मात्र या विनंतीला त्यांनी दाद दिली नव्हती. अखेर सदर महिलेने या दोघांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. या तक्रारीमुळे गंगवाल व बोहरा हे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शेरेबाजी करू लागले. त्यांनी देवेंद्रला फोन करतो, अशी धमकी साहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे यांना दिली. तसेच गंगवाल हा लोखंडे यांच्या अंगावर धावून गेल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. गंगवाल व बोहरा यांनी पोलिसांना केलेली दमबाजी व पोलिसांच्या विरोधात केलेली शेरेबाजीचे चित्रीकरण पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी पाटील यांनी दिली आहे. संशयित आरोपी गंगवाल याच्या नावापुढे वकील अशी पदवी लागत असल्याने त्याने आपला वकिलीबाणा रविवारी रात्री पोलिसांना दाखविला.
अटकेनंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात नेण्याची कायदेशीर पद्धत आहे. तेथेही गंगवाल याने आपला धूर्तपणा वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखविण्याचा प्रयत्न केला. माझा मेंदू दुखत असल्याचे सांगून त्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात पाठविल्याची माहिती पाटील यांनी दिली.
प्रकरणाचे भांडवल करण्याचा प्रयत्न -पोलीस
खारघर पोलिसांनी व्ही. एन. म्हात्रे विद्यालयातील शाळकरी मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी या विद्यालयाचा स्कूल बस चालक वकील तुलशी महतो याला अटक केली आहे. मात्र हे विद्यालय बडय़ा उद्योजकाचे असल्याने तेथे समाजसेवक व पत्रकार असल्याचे भासवून या प्रकरणाचे भांडवल करण्याचा गंगवाल याचा प्रयत्न होता, असे पोलिसांचे मत आहे. गंगवाल याने आपला स्वार्थ साधण्यासाठी खारघर पोलीस ठाण्याच्या इमारतीमध्ये निर्भया प्रकरणाची आठवण करून पोलिसांवर आरडाओरड करत होता, असे सांगण्यात येते.