प्रवासामध्ये आंध्र प्रदेशातील एका राखीव पोलीस दलाच्या पोलीस निरीक्षकाचे चोरलेल्या पिस्तूलची पुण्यात विक्री प्रकरणी गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख रुपयांचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
नईम अब्दुल करीम अन्सारी (वय २५, रा. वाघोली) आणि अफताब अजिज अन्सारी (वय ४०, रा. अहमदाबाद, दोघेही मूळ- उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर यांना येरवडा येथील रेड्डी ढाब्यासमोर एक व्यक्ती पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार ४ जानेवारी रोजी सापळा रचून नईम याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या तपासात हे पिस्तूल अफताब याने चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला ही अटक करण्यात आली.
याबाबत गोवेकर यांनी सांगितले की, आंध्र प्रदेशमधील एका राखीव पोलीस दलाचा पोलीस निरीक्षक बसमधून बंदोबस्तासाठी जात होता. त्या बसमधून अफताब याने त्या पोलीस निरीक्षकाची बॅग चोरली. त्या बॅगमध्ये हे पिस्तूल होते. याप्रकरणी २०१० मध्ये हैद्राबाद येथील अफजलगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दोघेही वाघोली येथील एका बेकरीत काम करतात. बसमध्ये बॅग घेऊन चढायचे आणि रस्त्यात मध्येच आपली बॅग ठेवून उतरायचे, अशा पद्धतीने ते चोऱ्या करतात.