नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीत दोन उमेदवारांचा पराभव जिव्हारी लागणारा ठरला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या प्रभागात पडलेली नोटा (नन ऑफ द अबव्ह) मते त्यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरलेल्या मतांपेक्षा किती तरी जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मतदार राजाने केलेल्या या नोटाच्या प्रयोगामुळे एखाद्या उमेदवारांची राजकीय कारर्कीद धुळीस मिळाल्याचे दिसून आले आहे. नोटाचा तोटा झालेल्या उमेदवारांत नेरुळचे शिवसेना उमेदवार अब्दुला ऊर्फ समीर बागवान यांना मोठा बसला आहे. ते केवळ तीन मतांनी पराभूत झाले असून त्यांच्या प्रभागात ५६ नोटा मतदान झालेले आहे. याशिवाय तुर्भे येथील भाजपच्या पहिल्या महापौर विजया घरत यांना देखील सहा मतांनी पराभव सहन करावा लागला आहे. त्यांच्या प्रभागातही २५ मते नोटा मतदान आहे.
शिवसेनेने उमेदवारी वाटपात केलेल्या अनेक चुकांमुळे निवडणुकीत ४१ उमेदवारांनी बंडाचे निशाण फडकविले होते, मात्र नेरुळच्या प्रभाग क्रमांक १०९ मध्ये शिवसेनेने ही चूक केली नव्हती. त्या ठिकाणी एक सर्वसाधारण, मेहनती आणि कडवट शिवसैनिकाला उमेदवारी दिली होती. नेरुळ प्रभाग क्रमांक १०९ मध्ये मावळत्या सभागृहातील उपमहापौर अशोक गावडे या तगडय़ा उमेदवाराची लढत समीर बागवान या कट्टर शिवसैनिकामध्ये झाली. बागवान हे शिवसेनेचे पहिले मुसलमान उमेदवार होते. त्यांनी केलेले कार्य आणि पालिका मुख्यालयासमोरील सर्वात उंच राष्ट्रीय ध्वजाबद्दलची आत्मीयता यामुळे ते प्रभागात चांगलेच लोकप्रिय ठरले होते. त्या बागवान यांनी कडवी लढत गावडे यांच्या बरोबर दिली. त्यात त्यांचा पराभव केवळ तीन मतांनी झाला. त्यामुळे पुनर्मतमोजणीची मागणी न करता बागवान अत्यंत दु:खी मनाने मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले. त्यांच्या या पराभवावर अनेकांनी हळहळ व्यक्त  केली.
असाच एक दुसरा पराभव शहराने बघितला. तुर्भे येथील दिवंगत डी. आर. पाटील कुटुंबाची घराणेशाही उद्ध्वस्त करण्यास राजकारणात उतरलेल्या रामचंद्र घरत यांच्या पत्नी विजया घरत यांचा पराभव दिवंगत भोलानाथ पाटील यांची पत्नी शशिकला यांनी केला. हा पराभव केवळ सहा मतांनी झाला. त्यांच्या प्रभागातही २५ मते ही नोटाला देण्यात आलेली आहेत. घरत बाईंना एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू असण्याचे कारण त्यांचे पती रामचंद्र घरत हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. निवडणुकीत एकूण ५३५४ नोटा मतदान झाले. यार्चा सर्वाधिक फटका बागवान, घरत यांना बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा