मराठवाडय़ातल्या अन्य जिल्ह्य़ांच्या तुलनेत नांदेडमध्ये दुष्काळाच्या झळा अजून तीव्र नसल्या, तरी आतापर्यंत पिण्याच्या पाण्यावर सुमारे २ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
आजमितीस जिल्ह्य़ात ७९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ६४ शासकीय टँकर वेगवेगळ्या भागातील नागरिकांची तहान भागवत आहेत. सर्वाधिक म्हणजे तब्बल ३७ टँकर लोहा तालुक्यात, तर त्यापाठोपाठ २४ टँकर कंधार तालुक्यात आहेत. जिल्ह्य़ात १०३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी आतापर्यंत सुमारे २ कोटी रुपये खर्च झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ५ वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्य़ातल्या टँकरची संख्या ५०० पर्यंत गेली होती. यंदा भूजल पातळीत घट झाली असली तरी जादा टँकर लागणार नाहीत, असे सांगण्यात आले.
नांदेड जिल्ह्य़ात बीड, जालन्याच्या तुलनेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर नाही. शहरातील काही भाग वगळला तर सर्वत्र सध्या तरी पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. यंदा नांदेडसह काही तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. गेल्या तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे काही तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दुष्काळाच्या सर्वाधिक झळा कंधार-लोहा तालुक्यांना जाणवू लागल्या आहेत. चार वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी व जि. प.चे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या प्रयत्नाने अनेक ठिकाणी विहीर पुनर्भरणाचे उपक्रम राबवण्यात आले. शिवाय शाळकरी विद्यार्थ्यांच्या मदतीने अनेक ठिकाणी वनराई बंधारे उभारण्यात आले. सरकारच्या विशेष परवानगीने लाभक्षेत्रातही जलसंधारणेची कामे मोठय़ा प्रमाणावर झाली. त्याचा काही अंशी फायदा अनेक भागांना यंदा मिळाला. नांदेड शहराला जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. पण ग्रामीण भागात स्थिती गंभीर होऊ शकते.
दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. जिल्हाधिकारी धीरजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी वेगवेगळ्या भागातल्या पिण्याच्या पाण्याचा सातत्याने आढावा घेत आहेत. कोणत्याही परिस्थितीत पिण्याचे पाणी उपलब्ध झाले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा