चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुरेश गोउत्रे यांनी सेवानिवृत्तीला अवघ्या दोन दिवसाचा अवधी शिल्लक असतांना तब्बल ३० कोटींच्या १७७ कामांना मंजुरी देऊन त्याच्या निविदाही काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाजनको आर्थिक संकटात असतांना केंद्र प्रमुखांनीच कमिशनपोटी असे उद्योग सुरू केल्याने याची तक्रार थेट उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
आशिया खंडातील २३४० मेगावॅट स्थापित क्षमता असलेल्या क्रमांक दोनच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला सध्या भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. या केंद्रातून आजवर पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती झाली नसली तरी अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताने ऊर्जा खात्याची अक्षरश: आर्थिक लूट चालविली आहे. कोळसा खरेदीतून सुरू झालेल्या या भ्रष्टाचाराने आता परिसीमा गाठली असून विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुरेश गोउत्रे यांनी तर सेवानिवृत्तीला अवघ्या दोन दिवसाचा अवधी शिल्लक असतांना ३० कोटींच्या १७७ कामांना मंजुरी प्रदान केली आहे. ते रविवार ३० जूनला सेवानिवृत्त होत आहेत. यापूर्वीच त्यांनी १ ते ७ जून २०१३ या कालावधीत विविध १७७ कामांना मंजुरी देऊन त्याच्या निविदाही काढल्या आल्या. जवळपास ३० कोटी रुपयांची ही कामे आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण कामांपैकी ८० टक्के कामे विविध प्रकारच्या वस्तूंच्या पुरवठय़ाशी संबंधित आहेत. ही सर्व पुरवठय़ांची कामे पुरवठाधारकांशी संगनमत करून अव्वाच्या सव्वा भावाने काढण्यात आलेली आहेत. ही सर्व कामे प्रकाशगड मुख्यालयाने असंख्य त्रुटींमुळे रोखून धरली होती. मात्र, सेवानिवृत्तीची वेळ जवळ येताच गोउत्रे यांनी याच कामांची प्रकाशगडकडे शिफारस केली. आता सेवानिवृत्तीचे दिवस जवळ येताच या कामांची निविदा काढून संबंधित निविदाधारकांकडून जवळपास चार ते पाच कोटी कमिशनपोटी उकळले व महाजनकोवर अनावश्यक आर्थिक भरुदड बसवला. आधीच आर्थिक संकटात असलेल्या या प्रकल्पाला स्वत:च्या कमिशनसाठी अशाप्रकारची कंत्राटे काढून सुरेश गाउत्रे आणखी संकटात टाकले आहे.
महाऔष्णिक वीज केंद्रात कंत्राटदारांची एक स्वतंत्र लॉबी तयार झाली असून त्याच लॉबीच्या माध्यमातून हा संपूर्ण खरेदी व्यवहार होत असल्याचे समोर आले आहे. कंत्राटदारांची ही लॉबी मुख्य अभियंता गाउत्रे यांच्या पाठीशी आहे. विशेष म्हणजे, ही लॉबी सांगेल तिच कामे विद्युत केंद्रात मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत. दुसरीकडे गाउत्रे यांनी तांत्रिक कामांना प्राधान्य देण्याऐवजी विविध वस्तूंच्या पुरवठय़ाकडे लक्ष केंद्रित केले आहे. दोन दिवसाने सेवानिवृत्त होत आहे म्हणतांनाच त्यांनी १७७ कामांव्यतिरिक्त पुन्हा ६२ कामांना मंजुरी देऊन त्याच्याही निविदा काढल्या आहेत. यात अनावश्यक असंख्य वस्तूंच्या पुरवठय़ांच्या निविदांचाही समावेश आहे. या सर्व बाबींचा अधिक गवगवा होताच व या संपूर्ण कामांची तक्रार थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे झाल्याचे समोर येताच आता वीज केंद्रात वरिष्ठ अधिकारी व कंत्राटदारांच्या लॉबीने सारवासारव सुरू केली आहे. वरिष्ठ अधिकारी व कंत्राटदारांचे संगनमत लक्षात घेता या संपूर्ण कामांच्या निविदांची उच्चस्तरीय चौकशी करून गाउत्रे यांच्या सीजीएम कार्यकाळातील कामांची व त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी केली आहे. तसेच केंद्रीय दक्षता आयोग, गृह विभाग, विभागीय आयुक्त, आयकर व ऊर्जा विभागा मार्फतही गाउत्रे यांच्या भ्रष्ट कारभाराची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई व्हावी, अशीही मागणी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री, तसेच ऊर्जामंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, यासंदर्भात मुख्य अभियंता गाउत्रे यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी तो उचलला नाही, तर वीज केंद्राचे जनसंपर्क अधिकारी मसराम यांना विचारणा केली असता तक्रार बघितल्यानंतरच आपण काय ते बोलू, असे सांगून वीज केंद्रात सर्व काही नियमाने होत असल्याची माहिती त्यांनी दिली. एकूणच ३० कोटीच्या १७७ निविदांमुळे औष्णिक विद्युत केंद्र चर्चेत आले आहे.
वीज निर्मिती ७०० मेगावॅटवर
मुसळधार पावसात वीज केंद्रातील सर्व कोळसा ओला झाल्याने वीज निर्मिती निम्म्यावर म्हणजे ७०० मेगावॅटवर आली आहे. २१० मेगावॅटचा चौथ्या क्रमांकाचा संच बंद पडला आहे, तर २१० मेगावॅटच्या तीन संचातून केवळ ३० ते ५० मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. ५०० मेगावॅटच्या संचातून २०० ते २५० मेगावॅट वीज निर्मिती सुरू आहे. छोटा नागपूर ते वीज केंद्र या रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असल्याने दोन हजार क्विंटल कोळशाचा पुरवठा ठप्प झाला आहे.