यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त २४ व २५ नोव्हेंबर या दोन दिवसांत पुणे विभागातील नगरपालिकांचे अधिवेशन कराड नगरपालिकेतर्फे येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात आयोजित केले आहे.
कराड पालिकेने या अधिवेशनासाठी २० लाख रुपये खर्चास मंजुरी दिली आहे. येत्या शनिवारी, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता नगरविकास राज्यमंत्री भास्करराव जाधव यांच्या हस्ते व आमदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे महासंचालक रणजित चव्हाण यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
रविवारी सकाळी साडेदहा वाजता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशनाचा समारोप होणार आहे. राज्याचे ग्रामविकासमंत्री व अर्थमंत्री जयंत पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री रामराजे निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील यांची यावेळी उपस्थिती असणार आहे. पुणे विभागातील नगरपालिकांच्या प्रतिनिधींना अधिवेशनाच्या निमंत्रणपत्रिका पाठवण्यात आल्या असून, उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्षा प्रा.उमा हिंगमिरे यांनी केले आहे.

Story img Loader