पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या टँकरला एसटीने धडक दिल्याने शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात दोन प्रवासी जागीच ठार झाले. पुण्याहून सांगलीला येत असणाऱ्या या अपघातग्रस्त बसमधील दोन महिलांसह १० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना कराडच्या कृष्णा हॉस्पिटलसह अन्य इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सांगली आगाराची बस ही पुण्याहून निघालेली बस कासेगाव (जि. सांगली) जवळ आल्यानंतर टँकरला धडकली. हा टँकर पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या बाजूपट्टीवर नादुरुस्तीमुळे उभा होता. उभ्या असलेल्या टँकरवर एसटी बस येऊन आदळल्याने झालेल्या अपघतात विजय श्रीरंग खराडे (वय २४ रा. रामनगर,आष्टा) आणि सुधीर सिद्राम गुरव (वय २७ रा. वसुदी ता. सांगोला) हे दोन प्रवासी जागीच ठार झाले.
या दुर्घटनेत शालन धनपाल चौगुले, पवित्रा प्रदीप चौगुले या दोन महिला आणि जया प्रदीप चौगुले ही ९ महिन्यांची मुलगी जखमी झाले आहेत. याशिवाय पोपट हंबीरराव पाटील, प्रमोद रामचंद्र वसगडे, श्रीकांत गजानन गुरव, अभिजित रमेशराव कुलकर्णी, अजय श्रीरंग खराडे, अजित गणपतराव खांबे या प्रवाशांसह बसचालक सोमनाथ सदाशिव नवले हे जखमी झाले आहेत.
याबाबत बसमधील प्रवासी अमित विलास पाटील याने बसचालक सोमनाथ नवले याच्या विरुद्ध कासेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जखमी प्रवासी व बसचालक यांना पोलिसांनी तत्काळ कराडच्या कृष्णा हॉस्पिटल आणि राजारामबापू हॉस्पिटल इस्लामपूर या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले. काही प्रवाशांना त्यांच्या नातेवाइकांनी सायंकाळी खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे. ज्या टँकरवर एसटीबस आदळली, त्या टँकरचे चाक पंक्चर झाले होते. टँकरचा चालक आणि क्लीनर रस्त्याच्या बाजूपट्टीवर वाहन घेऊन चाक बदलण्याच्या प्रयत्नात होते. याच वेळी बस आदळल्याने टँकरचा चालक व क्लीनर टँकरखालून बाजूला झाले. त्यामुळे ते बचावले. या दुर्घटनेची माहिती नागरिकांनी तत्काळ कासेगाव पोलीस स्टेशनला दिली. महामार्गावर पहाटे ३.४५ वाजता अपघात झाल्याने अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळू शकली नाही. या अपघातामुळे पुण्याहून कोल्हापूर सांगलीकडे येणाऱ्या वाहनांची कोंडी झाली होती. सुमारे दोन तासांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा