गेल्या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीने लोअर दुधना प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट असताना अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बुधवारी मोठा पाऊस होऊनही जलसाठा वाढला नाही. प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडेच राहिल्याने सेलू, मंठा, परतूर या तिन्ही तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊनही धरणातून पाणी वाया गेले. हेच पाणी दुधना नदीच्या पात्रातून दुथडी भरुन वाहिल्याने अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती ओढवली. दरम्यान रंगरंगोटीसाठी हे दरवाजे उघडे राहिल्याचे कारण अधिकाऱ्यांकडून दिले गेले आहे. जे अधिकारी या हलगर्जीपणाला जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
गेल्या वर्षीच्या भीषण पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर अधिकाऱ्यांकडून पुरेशा गांभीर्याची अपेक्षा असताना यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लोअर दुधनाच्या कार्यक्षेत्रातील बऱ्याच पाण्याचा अपव्यय झाला आहे. दुरूस्तीसाठी व रंगरंगोटीसाठी हे दरवाजे उघडे राहिले व ते केवळ चार इंच उघडे होते, असे आता लोअर दुधनाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. बुधवारी परतूर, मंठा या दोन्ही तालुक्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाला. या तालुक्यातील पावसाचा लाभ थेट लोअर दुधनाला आहे. या पावसामुळे प्रकल्पात पाणी येते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने वरील दोन्ही तालुक्यातला अनेक गावांचा संपर्क तुटला होता. तर काही ठिकाणची वाहतूक बंद होती. असे असताना हे पाणी धरणात मात्र साठले गेले नाही. धरणाचे दोन दरवाजे केवळ चार इंच उघडे राहिल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात दरवाजे जास्त उघडे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पाण्याचा या पद्धतीने अपव्यय व नासाडी होण्याची ही दुसरी वेळ असून मे महिन्यात लोअर दूधना प्रकल्पावरून मानवत शहराला पाणीपुरवठा करतानाही याच पद्धतीने पाण्याचा अपव्यय झाला होता. त्यावेळी या प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविले जावेत, अशी मागणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात भर उन्हाळ्यात अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे झालेली पाण्याची नासाडीही दुर्लक्षित करण्यात आली होती. लोअर दुधनाच्या बाबतीत अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा असा वारंवार दिसून येत आहे. दरम्यान आतापर्यंतच्या पावसाने धरणातील पाण्याची पातळी ४१९.७५० मीटर एवढी वाढली असून जलसाठा ८१ दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे.
प्रकल्पातील पाण्याची नासाडी करण्यास जे जबाबदार आहेत त्यांच्याविरुद्ध सिंचन कायदा १९७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. राजन क्षीरसागर यांनी केली आहे. तसेच सेलू तालुक्यातील राजकीय कार्यकर्त्यांनीही पाण्याच्या या नासाडीबद्दल लोअर दुधना प्रकल्पावर जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांनी थातुरमातूर उत्तरे देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
लोअर दुधनाचे दोन दरवाजे उघडेच; म्हणे, ‘रंगरंगोटी’मुळे झाला पाण्याचा अपव्यय!
गेल्या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीने लोअर दुधना प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट असताना अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बुधवारी मोठा पाऊस होऊनही जलसाठा वाढला नाही.
First published on: 05-07-2013 at 01:10 IST
TOPICSप्रोजेक्ट
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two door open of lower dudhna saidwastage of water to colouring