मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जंक्शन ते पुणे जंक्शन ही साप्ताहिक एक्स्प्रेस वसई पनवेलमार्गे धावणार आहे. तसेच लोकमान्य टर्मिनसहून सोलापूर-हुबळी ही रेल्वे एक्स्प्रेस पनवेल मार्गावरून धावणार असल्याने नोव्हेंबर महिन्यातील हिवाळी हंगामात पनवेलच्या प्रवाशांना दोन नवीन गाडय़ांची भेट रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
देशातील सर्वात मोठे टर्मिनल अशी ओळख निर्माण करणाऱ्या पनवेल रेल्वे स्थानकाचा चढता आलेख सुरूच आहे. पुणे-ग्वाल्हेर एक्स्प्रेस (क्र.१११०१) ही  रविवारी मध्यरात्री १२.२५ मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकातून सुटून सोमवारी पहाटे २.५० मिनिटांनी पनवेल स्थानकात पोहोचेल. येथील ५ मिनिटांच्या मुक्कामानंतर ही एक्स्प्रेस ग्वाल्हेरसाठी रवाना होईल. लोकमान्य टर्मिनसहून सोलापूर-हुबळी या पल्यावर धावणारी एक्स्प्रेस पनवेलमार्गे धावणार आहे. (क्र. १७३२२) ही एक्स्प्रेस दर रविवारी रात्री सव्वानऊ वाजता लोकमान्य टर्मिनसहून सुटेल आणि पनवेल रेल्वे स्थानकात  १० वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल. सकाळी आठ वाजून ३५ मिनिटांनी ही एक्स्प्रेस सोलापूर स्थानकात पोहोचेल. सध्या मालवाहतूक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या अप-डाऊन मार्गावर ५० रेल्वेगाडय़ा पनवेलमार्गे धावतात.

Story img Loader