केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू मध्यम शहर विकासपुनरूत्थान महाभियानांतर्गत सोलापूर महापालिकेच्या परिवहन उपक्रमासाठी मंजूर झालेल्या दोनशे बसेस लवकरच शहरात धावणार असून याच योजनेतून आलेल्या व्हॉल्वो मॉडेल बसचा शुभारंभ व राजेंद्र चौकातील बस आगारातील सुधारणा कामांचा भूमिपूजन सोहळा उद्या शनिवारी दुपारी चार वाजता केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याहस्ते संपन्न होणार आहे.
दरम्यान, सुशीलकुमार शिंदे उद्यापासून चार दिवसांच्या भेटीसाठी सोलापुरात येत आहेत. या भेटीत ते सोलापूर लोकसभा  मतदारसंघातील जनसंपर्कासाठी सोलापूरसह पंढरपूर, मंगळवेढा आदी भागांचा दौरा करणार आहेत. त्याच भेटीचे औचित्य साधून सोलापूर महापालिका परिवहन समितीने जवाहरलाल नेहरू मध्यम शहर विकास पुनरूत्थान महाभियानाअंतर्गत केंद्राकडून मंजूर     झालेल्या दोनशे बसेसचा मुहूर्तमेढ शिंदे यांच्या हस्ते करण्याचे ठरविले आहे. महापौर अलका राठोड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास स्थानिक आमदार व महापालिकेचे अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शहरात दोनशे बसेस आणण्यासाठी पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करून केंद्राकडे सादर केला होता. त्यावर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांनी राजकीय वजन वापरून ही योजना मंजूर करून आणली.
दोनशे बसेसमध्ये एकूण तीन प्रकार राहणार आहेत. यात १४५ मोठय़ा बसेस समाविष्ट असून, ३५ मिनी बसेस येणार आहेत. याशिवाय व्हॉल्वो कंपनीच्या २० वातानुकूलित बसेसची भर पडणार आहे. एकूण बसेसची किंमत १११ कोटी ६ लाख २० हजार इतकी आहे. शिवाय बुधवार पेठेतील मुख्य आगारासह राजेंद्र चौक व सात रस्त्यावरील उपआगाराच्या सुधारणा केल्या जाणार आहेत. त्यासाठी नऊ कोटी ४५ लाखांचा निधी खर्च होणार आहे.

Story img Loader