दीड लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान
नागपूर जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे दोनशे गावांना फटका बसला असून दीड लाख हेक्टरमधील पिकांचे आणि दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्य़ात जवळपास चार हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्य़ाचे सरासरी पर्जन्यमान ११३८, ८६ मि.मी. असून आतापर्यंत ८३३.०८ मि.मी. पाऊस झाला आहे. १ ऑगस्टपर्यंत सरासरीच्या ८०.३० टक्के पाऊस झाला. जिल्ह्य़ात खरिपाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ४ लाख, ८३ हजार हेक्टर असून ४ लाख, ३६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. यावर्षी ९० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असली तरी अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिकांनाच फटका बसला आहे. यातील दीड लाख हेक्टरमधील पिकांचे पूर्णत: नुकसान झाले असून पाऊस सुरूच असल्याने उर्वरित क्षेत्रातील पिकेही पिवळी पडलेली आहेत.  
गेल्या दोन आठवडय़ापासून उघडीप नसल्याने सूर्यप्रकाश न मिळाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. यामध्ये कापूस व सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाने तालुकापातळीवर नुकसानीबाबतचे प्राथमिक सर्वेक्षण करून शासनाकडे अहवाल पाठविले आहेत, पण पाऊस सुरूच असल्याने पिकांच्या नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होत आहे.
जिल्ह्य़ात ७५ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे ५० टक्क्यांच्या वर तर ७५ हजार हेक्टरमधील पिकांचे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने घरांची पडझड झाली आहे. नागपूर ग्रामीण, हिंगणा, उमरेड, भिवापूर, रामटेक, कामठी, कळमेश्वर, मौदा, पारशिवनी व सावनेर तालुक्यांतील दोनशे गावांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्य़ात ३ हजार किलोमीटर लांबीचे ग्रामीण तर एक हजार किलोमीटर लांबीचे मुख्य रस्ते खराब झाले. बुधवारी काटोल तालुक्यात सर्वाधिक १२७ मि.मी. पावसाची
नोंद झाली.

उरलेलेही गेले – धोपटे
यावर्षी पावसामुळे नागपूर जिल्ह्य़ात कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी झालेल्या अतिवृष्टीने उरले सुरले गेले आहे. जिल्ह्य़ात नुकसानीबाबत नव्याने सर्वेक्षण सुरू आहे. पाऊस सतत होत असल्याने नुकसान वाढतच आहे. नुकसानग्रस्त शेतक ऱ्यांना सरकारकडून मदत मिळणार आहे, पण ही मदत अल्पशी असल्याने जिल्हा परिषदेनेही शेतक ऱ्यांना मदत द्यावी, यासाठी कृषी समितीने जिल्हा परिषदेला एक प्रस्ताव पाठविला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्हा परिषदेकडूनही मदत मिळायला हवी, असे नागपूर जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती वर्षां धोपटे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

नागपूर जिल्ह्य़ात
झालेला पाऊस (मिमी)
नागपूर शहर     १०२
नागपूर ग्रामीण     १०२
कामठी         १०७
हिंगणा         ५९
काटोल         १२७
नरखेड         ११०
सावनेर         ९७
कळमेश्वर         १००
रामटेक         ७०
पारशिवनी         १०५
मौदा         ६१
उमरेड         ६७
भिवापूर         ६६
कुही         ४८

Story img Loader