मालिका बनविण्यासाठी करोडो रुपयांची गुंतवणूक करण्याच्या नावाखाली एका नवख्या कलाकाराची दोन लाखांची फसवणूक करणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याविरोधात कोपरखैरणे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच परिसरातील अनेक होतकरू तरुणांना आरोपीने नोकरी लावण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे.
किरण दीपक महाडिक ऊर्फ बंटी महाडिक असे आरोपीचे नाव आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी जवळीक असलेल्या महाडिक याने सचिन आनंद कोंढाळकर या नवख्या कलाकाराला मालिका बनविण्यासाठी पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. या गुंतवणुकीसाठी करारनामा तयार करण्यासाठी महाडिक याने त्याच्याकडे दोन लाखांची मागणी केली होती.
याप्रमाणे कोंढाळकर याने जानेवारी महिन्यात दोन लाख रुपये दिले होते, मात्र सात महिन्यांनंतर त्याने करार न केल्याने सचिन याने पैसे परत करण्याची मागणी केली असता, महाडिक याने त्याला धनादेश दिला होता.
मात्र हा धनादेश न वठल्याने सचिन याने त्याला जाब विचारल्याने राग आलेल्या महाडिक याने त्याच्या साथीदारासह गुरुवारी त्याच्या घरी घुसून त्याला बेदम मारहाण केली. या प्रकरणी सचिन याने दिलेल्या तक्रारीवरून महाडिक याच्या विरोधात कोपरखैरणे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. महाडिक याने परिसरातील अनेक तरुणांकडून नोकरीला लावण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचे समोर आले आहे.
मालिका बनविण्याच्या नावाखाली कलाकाराची दोन लाखांची फसवणूक
मालिका बनविण्यासाठी करोडो रुपयांची गुंतवणूक करण्याच्या नावाखाली एका नवख्या कलाकाराची दोन लाखांची फसवणूक करणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याविरोधात कोपरखैरणे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
First published on: 05-07-2014 at 02:16 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two lakh fraud with artist in the name of making tv serial