कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मुंबईमध्ये महापालिका व राज्य शासनाचे एकही रुग्णालय नाही. मरोळ येथील पालिकेच्या कॅन्सर रुग्णालयाचा भूखंड पालिकेतील शिवसेना-भाजपने सेव्हन हिल्स रुग्णालयाला दिल्यानंतर गोरगरीब कॅन्सर रुग्णांना पालिकेच्या दराने उपचार मिळू शकत नाहीत. या पाश्र्वभूमीवर भांडूप पश्चिम येथे मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवर महापालिकेला नागरी विकासासाठी दोन लाख चौरस फूट जागा उपलब्ध झाली आहे. या जागेवर महापालिकेने सुसज्ज कॅन्सर रुग्णालय उभारावे, अशी मागणी मनसेचे आमदार शिशिर शिंदे यांनी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे केली आहे.
दिवसेंदिवस कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत असून टाटा कॅन्सर रुग्णालय अपुरे पडत असल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. कॅन्सर रुग्णांना उशिरा उपचार मिळणे म्हणजे त्यांचे मरण जवळ येणे असते. महापालिकेच्या नायर रुग्णालयात कॅन्सर रुग्णांसाठी ७४ खाटांची व्यवस्था केली असली तरी पूर्व व पश्चिम उपनगरातील ९६ लाख लोकसंख्येचा विचार करता भांडूप पश्चिम येथे पालिकेला उपलब्ध झालेल्या दोन लाख चौरस फूट जागेवर कॅन्सर रुग्णालय उभारण्याची मागणी आमदार शिंदे यांनी केली आहे.
विकास नियंत्रण नियमावलीअंतर्गत ‘रुणवाल ग्रीन्स’ या विकासकाने हा भूखंड पालिकेकडे हस्तांतरित केला आहे. कॅन्सर रुग्णालय उभारल्यास पालिकेला चार चटईक्षेत्र मिळू शकते. याचाच अर्थ दोन लाख चौरस फूट भूखंडावर प्रत्यक्षात आठ लाख चौरस फूट जागा बांधकामासाठी उपलब्ध होणार असून देशातील सर्वोत्तम कॅन्सर रुग्णालय उभारणे शक्य होऊ शकते. गरीब रुग्णांना पालिकेच्या दराने व आर्थिकदृष्टय़ा खर्च परवडणाऱ्यांकडून पैसे घेऊन कॅन्सर रुग्णालय उभारल्यास पालिकेवर मोठा आर्थिक भारही पडणार नाही, अशी भूमिका शिंदे यांनी आयुक्त कुंटे यांच्याकडे मांडली आहे.
कॅन्सर रुग्णालयासाठी पालिकेला दोन लाख चौरस फूट जागा !
कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मुंबईमध्ये महापालिका व राज्य शासनाचे एकही रुग्णालय नाही. मरोळ येथील पालिकेच्या कॅन्सर रुग्णालयाचा भूखंड पालिकेतील शिवसेना-भाजपने सेव्हन हिल्स रुग्णालयाला दिल्यानंतर गोरगरीब कॅन्सर रुग्णांना पालिकेच्या दराने उपचार मिळू शकत नाहीत.
First published on: 09-04-2013 at 12:53 IST
TOPICSप्लॉट
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two lakh sq ft plot to corporation for cancer hospital