गरीब अल्पवयीन मुलींच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून देहविक्री व्यवसायात ढकलणाऱ्या एका दाम्पत्याला एपीएमसी पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. त्याचप्रमाणे या मुलींवर बलात्कार करणाऱ्या नेरुळ येथील बांधकाम व्यावसायिकालादेखील या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
हिर कबीराज व रुनू कबीराज असे अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. मूळचे पश्चिम बंगाल येथील बिलासपूर येथील रहिवासी असलेले हे दाम्पत्य गेल्या कित्येक वर्षांपासून वाशीतील कोपरी गावात राहत होते. या ठिकाणी हिर याने पानाची टपरी सुरू केली होती. त्याची पत्नी रुनू देहविक्रीच्या व्यवसायात कार्यरत होती. याच दरम्यान कोपरी गावात राहणाऱ्या दोन गरीब घरांतील मुली त्यांच्या संपर्कात आल्या. दोघींची परिस्थिती हलाखीची. यात एका मुलीची आई ही धुणीभांडी करते, तर दुसऱ्या मुलीला वडील असून तो मद्यपी असल्याने दोन वेळचे जेवण मिळणेदेखील कठीण होते. याचा फायदा घेत हिरन्मय याने दोघींना देहविक्री व्यवसाय करण्यास भाग पाडले. दरम्यान, त्यानेदेखील त्या दोन्ही मुलींवर बलात्कार केला. यानंतर नेरुळ येथील बांधकाम व्यावसायिक दिनेश घाडगे या ग्राहकाच्या ताब्यात त्याने या मुलींना दिले होते. घाडगे याने त्याच्या मालकीच्या लोणावळा येथील फार्म हाऊसवर नेऊन त्यांच्यावर बलात्कार केला होता.
कबीराज याने या मुलींना देहविक्री व्यवसायात ओढल्याचे कोपरी गावात राहणाऱ्या आशा राऊत या महिलेच्या लक्षात आले. त्या दोन्ही मुलींना त्यांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी सर्व माहिती त्यांना सांगितली. यानंतर राऊत यांनी त्या मुलींसह एपीएमसी पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दिली. एपीएमसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने प्रथमत: घाडगे याला अटक केली. दरम्यान, कबीराज आणि त्याच्या पत्नीने नवी मुंबईतून पळ काढून मूळ गाव गाठले होते. पोलिसांच्या एका पथकाने त्यांना बिलासपूर येथून अटक केली असल्याची माहिती परिमंडळ १चे पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी दिली. या दाम्पत्याने आणखी कोणा मुलींना हा व्यवसाय करणे भाग पाडले आहे का, याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader