महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी पक्षाच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने हिंगोलीत आले. शासकीय विश्रामगृहावर छोटेखानी बैठकीची त्यांनी परवानगी घेतली खरी. परंतु प्रत्यक्षात चक्क विश्रामगृहाच्या छतावर व्यासपीठ उभारून तेथून ‘मी तुम्हाला जालन्यास होणाऱ्या सभेचे निमंत्रण देण्यासाठी आलो आहे. असेच प्रेम यापुढेही असू द्या.’ असे म्हणून उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त केले. राज ठाकरेंच्या या कृतीवर सार्वजनिक बांधकाम खाते आता कोणती भूमिका घेते, याची उत्सुकता आहे.
गेल्या ४ दिवसांपासून मनसेच्या वतीने राज यांच्या स्वागताची कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली. पक्षाच्या आढावा बैठकीसाठी शासकीय विश्रामगृहातील खोलीचे आरक्षण करण्यात आले. माजी आमदार बळीराम पाटील यांचे नातू ओम काटकर, तसेच रामरतन शिंदे हे मनसेत प्रवेश करणार असल्याने ग्रामीण भागातून मोठय़ा प्रमाणात युवक उपस्थित होते. या गर्दीमुळे हिंगोली-वाशीम रस्ता जवळपास तीन तास जाम झाला होता. त्यात मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची १२ वाजता पत्रकार बैठक असल्याचे निमंत्रण पत्रकारांना दिल्यामुळे पत्रकारही त्यांच्या प्रतीक्षेत होते. राज ठाकरे दुपारी तीनच्या सुमारास आले. परंतु मी माध्यमांशी बोलणार नाही, म्हणत पत्रकारांना नमस्कार करून निघून गेले.
विश्रामगृहाच्या छतावरून राज ठाकरे लोकांशी संवाद साधतील करतील, या साठी परवानगीशिवाय व्यासपीठ उभारले गेले. ध्वनिक्षेपक व्यवस्था करण्यात आली. पक्षाचे झेंडे लावण्यात आले. मात्र, राज ठाकरे यांनी तीनचार हजार लोकांसमोर बोलताना, ‘आज मी येथे सभेचे भाषण करायला आलो नाही. केवळ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन तुम्हाला जालना येथील जाहीर सभेला मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यासाठी आलो आहे. तुम्ही येथे मोठय़ा संख्येने आलात. असेच प्रेम असू द्या.’ असे बोलून भाषण आटोपते घेतले.
दोन मिनिटे भाषण, तीन तासांची प्रतीक्षा!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी पक्षाच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने हिंगोलीत आले. शासकीय विश्रामगृहावर छोटेखानी बैठकीची त्यांनी परवानगी घेतली खरी.
First published on: 26-02-2013 at 12:42 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two minutes speech and waiting from three hours