शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागे राजू रामल्लू अलकंटीवार (४०) याचा तर ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत येणाऱ्या शिवनपायलीच्या जंगलात एका अनोळखी महिलेचा मृतदेह मिळाला असून या दोघांचा मृत्यू बिबट व वाघाच्या हल्ल्यात झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान, या जिल्हय़ात वाघ व बिबटय़ाच्या हल्ल्यात ४८ दिवसात अकरा लोकांचे मृत्यू झाल्याने वन खाते हादरले आहे.
जिल्हय़ात बिबट व वाघाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून जंगलातील बिबट आता थेट शहरात दाखल झाले आहेत. दोन दिवसापूर्वी लालपेठ वसाहतीत एका मनोरुग्ण महिलेची शिकार बिबटय़ाने केल्यानंतर आता चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागे राजू रामल्लू अलकंटीवार याच्या नरडीचा घोट घेतला. हिंग्लाज भवानी वार्डातील रहिवासी असलेला अलकंटीवार हा नियमित मद्यसेवन करायचा. चार दिवसापूर्वी मद्यसेवन करून तो अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागच्या बाजूला फिरत होता. तेथेच त्याच्यावर बिबटय़ाने हल्ला केला. सलग तीन दिवसापासून राजू घरी आला नाही म्हणून कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. अशातच आज सकाळी त्याचा मृतदेह मिळाला.
या घटनेची माहिती पोलीस तसेच वन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच सहायक उपवनसंरक्षक पवार, कुळमेथे व वनपरिक्षेत्राधिकारी शिंदे घटनास्थळी दाखल झाले. पोलीस व वन विभागाने संयुक्तपणे पंचनामा केला असता मृतदेह पूर्ण कुजलेल्या अवस्थेत होता. बिबट किंवा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असावा असे वन व पोलीस दलाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
दुसऱ्या घटनेत ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत येणाऱ्या शिवन पायलीच्या जंगलात एका अनोळखी महिलेचा मृतदेह मिळाला. ही महिला चार दिवसापूर्वी जंगलात गेली असावी आणि तिच्यावर वाघाने हल्ला केला असता त्यात मृत्यू झाला असावा असे सांगण्यात येत आहे. हे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर डॉ. भोंगळे यांनी शवविच्छेदन केले. यात वन्यप्राण्यांच्या जखमी राजूच्या शरीरावर दिसून आल्या. यासंदर्भात ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक संजय ठवरे यांच्याशी संपर्क साधला असता चार दिवसापूर्वी महिलेचा मृत्यू झाला असल्याने मृत्यूचे नेमके कारण सांगता येणार नाही असे ते म्हणाले. मात्र परिसरातील लोकांनी या महिलेचा मृत्यू हा वाघाच्या हल्ल्यातच झाला, असा दावा केला आहे.
दरम्यान, वाघ व बिबटय़ाने गेल्या ४८ दिवसांत अकरा लोकांचा बळी घेतल्याने वन खाते पुरते हादरले आहे. एकीकडे जंगलात वन्यजीव व मनुष्यात संघर्ष तीव्र झाला आहे. या संघर्षांतूनच बिबट व वाघ शहरात दाखल झाले आहेत. त्यातूनच या घटना घडत असल्याची माहिती वन खात्यातील सूत्रांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा