गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीनंतर मंजूर झालेल्या परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच जिल्हय़ास जोडणारे नवे दोन रेल्वेमार्ग प्रस्तावित झाले आहेत. रेल्वे अंदाजपत्रकात या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी तरतूद करण्यात आली. यात सोलापूर-जळगाव व  बेलापुरी-बीड-उस्मानाबाद या मार्गाचा समावेश आहे.
जिल्हय़ाच्या सर्वागीण विकासाला पूरक ठरणारा व दळणवळणातून इतर भागाशी जोडणारा परळी-बीड-नगर रेल्वेमार्ग उभारला जावा, या साठी तीन दशके आंदोलन झाले. केंद्र व राज्य सरकारच्या प्रयत्नांतून या मार्गाचे काम सुरू झाले. नगरकडून १५ किलोमीटपर्यंत रेल्वेचे रुळ टाकण्याचे काम झाल्याने जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परंतु आता हा मंजूर रेल्वेमार्ग निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याचे सोडून रेल्वे मंत्रालयाने आणखी नव्या दोन मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. यंदाच्या रेल्वे अंदाजपत्रकात परळी-बीड-नगर रेल्वेमार्गासाठी नव्याने फारशी तरतूदच केली नाही. तर दुसरीकडे सोलापूर-जळगाव व बेलापुरी-बीड-उस्मानाबाद या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हय़ात पुन्हा एकदा नव्या रेल्वेमार्गाची चर्चा सुरू झाली आहे.

Story img Loader