डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दोन खंड प्रकाशित करण्याचे निर्देश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीची स्थापना झाल्यापासून आजवर २२ खंड आणि दोन संदर्भ ग्रंथ एवढीच कामगिरी झाली आहे. शेवटचा चित्रमय चरित्र खंड चुकांमुळे गाजला. गेल्या तीन वर्षांपासून एकही नवीन खंड प्रकाशित झालेला नाही. याप्रकरणी भारतीय दलित पँथरने शासन पातळीवर सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर राज्याचे उच्च शिक्षण संचालक व प्रकाशन समितीचे निमंत्रक डॉ. प.रा. गायकवाड यांनी प्रकाशन समिती सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांना पत्र पाठवून खंड पुनर्प्रकाशित करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रा. डोळस यांना १२ मार्चला पाठवलेल्या पत्रातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रमय चरित्राचा सुधारित २२ वा खंड आणि प्रॉब्लेम ऑफ रूपीचा मराठी भाषांतर झालेला सहावा खंड पुनप्र्रकाशित करण्याविषयीचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे खंडाची मागणी पूर्ण होईल, अशी आशा आहे.
प्रॉब्लेम ऑफ रूपी, डॉ. आंबेडकरांचा एम.ए. शोधप्रबंध, पीएच.डी. आणि डी.एस्सी.चे प्रबंध व इतरही महत्त्वपूर्ण लिखाण असलेल्या या खंडाचा मराठी अनुवाद २१ ऑगस्ट १९९६ रोजी प्रकाशन समितीला प्राप्त झाला. शासकीय मुद्रणालय नागपूरने तिसऱ्यांदा संस्कारित मुद्रिते २९ जुलै २००८ मध्ये प्रकाशन समितीला पाठवली, तेव्हापासून खंडाची जनतेला प्रतीक्षा आहे.
लोकांच्या भावनांना डावलून तत्कालीन सदस्य सचिवांनी ती मुद्रिते कपाटात कोंबून ठेवली होती. या प्रकरणी भारतीय दलित पँथरने सतत पाठपुरावा केला. यामुळेच शासन स्तरावर दखल घेण्यात आली. प्रकाशन समितीच्या तीन बैठकीत नवीन खंड प्रकाशित होत नसल्याने मागणी असलेल्या आधीच्या खंडांचे तरी पुनप्र्रकाशन करावे, अशी भूमिका शासनाने घेतली आणि त्यांच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले. त्याबद्दल भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष प्रकाश बन्सोड यांनी शासनाचे आभार मानले आहेत.