पावसाळी हंगामाच्या ४० दिवसातच पश्चिम महाराष्ट्रातील विविध जलसिंचन प्रकल्प  सरासरी दोन तृतीयांश भरले असून, बहुतांश प्रकल्प क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत. महाकाय कोयना जलाशयात ४० दिवसात ५० टीएमसी पाण्याची आवक होऊन पाणीसाठा ७८.५९ टीएमसी म्हणजेच जवळपास ७५ टक्के राहिला आहे. वारणा धरणाचा पाणीसाठा २६.२९ टीएमसी म्हणजेच ७६.४३ टक्के असून, दुधगंगा प्रकल्पाचा पाणीसाठा १६.२६ टीएमसी म्हणजेच ६४ टक्के, भाटघर प्रकल्पाचा पाणीसाठा १४.५० टीएमसी म्हणजेच ६१.७० टक्के नोंदला गेला आहे. पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख २२ पाणी साठवण प्रकल्पात सध्या २१४.१३ टीएमसी पाणीसाठा असून, तो ६४.८७ टक्के आहे.
चालू हंगामातील पावसाची कामगिरी उत्तम राहिली आहे. सततच्या दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून, ठिकठिकाणच्या प्रकल्पाचा पाणीसाठा तुलनेत गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक असल्याची आकडेवारी आहे. आज दिवसभरातील संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर प्रकल्पातील पाणी साठय़ाची टक्केवारी चांगलीच वधारली आहे. मात्र, गतवर्षी पावसाळय़ाच्या ४० दिवसात पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पांमध्ये केवळ सुमारे २१ टक्के पाणीसाठा नोंदला गेला होता. कोयना धरण ६८ टक्के रिकामे होते. अत्यल्प पावसाने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले होते. खरीपाच्या पेरण्या धोक्यात येऊन दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. याऊलट यंदा मात्र, सततच्या पावसामुळे काही विभागात पेरण्यांची खोळंबली आहेत. तर, गतवर्षी तळ गाठून असलेले पाणी प्रकल्प तुडुंब भरून आहेत. काही प्रकल्प भरून वाहत असल्याचे चित्र आहे. आज दिवसभरात कोयना धरण क्षेत्रासह धरणाखालील कराड व पाटण तालुक्यात संततधार सुरू असल्याने बाजारपेठा ठप्प असून, सर्वत्र पाणीच पाणी होताना जनजीवन विस्कळीत आहे. सकाळी ८  ते सायंकाळी ६ या १० तासात धरणक्षेत्रातील नवजा विभागात सर्वाधिक ८० एकूण २,८१५ मि. मी., महाबळेश्वर विभागात ५८ एकूण २,४९०  तर, कोयनानगर विभागात ५३ एकूण २,३६५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणात ११,२२७ क्युसेक्स पाणी मिसळत असून, ४० दिवसात ५० टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. धरण क्षेत्रात सरासरी २,५५७ मि. मी. पावसाची नोंद आहे. गतवर्षी हाच पाऊस १,१३६ मि. मी. राहताना कोयना धरणाचा पाणीसाठा ३३.९८ टीएमसी म्हणजेच ३२.२८ टक्के होता. धरण क्षमतेने भरण्यासाठी ७३ टीएमसी पाण्याची गरज होती. सध्या धरण क्षमतेने भरण्यासाठी केवळ साडेसहवीस टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, धरणाखालील कृष्णा, कोयनाकाठीही समाधानकारक पाऊस झाला आहे. सरासरी कराड तालुक्यात २२२.६६ तर, पाटण तालुक्यात ७९४.१६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी कराड तालुक्यात १२२ तर, पाटण तालुक्यात ४३९ मि.मी. पावसाची नोंद होती. कोयना धरणक्षेत्रासह कृष्णा, कोयनाकाठी गतवर्षीच्या तुलनेत सव्वा दोनपटीने जादा पाऊस झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख १२ प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता  सुमारे २६१ टीएमसी आहे. त्यात सध्या १६४ टीएमसी म्हणजेच ६२.६३ टक्के पाणीसाठा आहे.  दरम्यान, कायम दुष्काळी खटाव, माण व फलटण तालुक्यासह काही विभागात अपेक्षित पाऊसमान झाला नसल्याने येथील जनता आभाळाकडे डोळे लावून आहे. उर्वरित हंगामात येथे पावसाची स्थिती कशी राहते यावर येथील पिण्याच्या चणचण अवलंबून राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख प्रकल्पात असलेला सध्याचा पाणीसाठा पुढील प्रमाणे- पाणीसाठा टीएमसीमध्ये तर कंसात त्याची टक्केवारी- कोयना जलसागर ७८.५९ (७४.६७) वारणा २६.२९ (७६.४३), दुधगंगा १६.२६ (६४), राधानगरी ६.३१ (७६),धोम ७.२५ (५३.७०), कण्हेर ६.४३ (६३.६८), उरमोडी ६.७६(६९), तारळी ४.९७ (८५ सध्या तारळी प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले आहे.), धोम बलकवडी २.२१ (५७), तुळशी १.८४ (५७), कासारी २.०१ (७३) पुणे जिल्ह्यातील वीर ४.३५ (४६.२७) नीरा देवघर ६.८८ (५८.५९), भाटघर १४.५० (६१.७०), पाटगाव २.५५ (६९), खडकवासला ०.८१ (४१.०१), पानशेत ६.७८ (६३.६४), वरसगाव ६.२८ (५९), टेमघर १.६७ (४४.९५), पवना ५.५०(६४.६९), साचकमन ५.२०(६८.५) तर गुंजवणी हा ०. ६९ टीएमसीचा छोटा प्रकल्प क्षमतेने भरला आहे.  
आज सकाळी ८ वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील पावसाची तालुकानिहाय सरासरी व कंसात एकूण पाऊस- सातारा ९.७ (३८६.९), जावली ९.२ (७०३.५), कोरेगाव ०.८ (१८४.८) वाई ६.१(३६८.५), महाबळेश्वर २२.५ (१०२१.५), खंडाळा १.७ (२२१.८) तसेच दुष्काळी फलटण ०.५ (१२३.६), माण ०.७ (९१.५), खटाव १.२(१४२.९) मि. मी पावसाची नोंद झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा