रस्त्यालगत कचरा पेटविणे कसे धोकादायक ठरू शकते, याचे प्रत्यंतर शुक्रवारी दुपारी शहराच्या मध्यवस्तीत दोन अलिशान मोटारींना लागलेल्या आगीवरून आले. पेटविलेल्या कचऱ्याची धग मोटारींपर्यंत गेली आणि पाहता पाहता त्या आगीच्या विळख्यात सापडल्या. अग्निशमन विभागाने या आगीवर नियंत्रण मिळविले असले तरी तोपर्यंत मोटारींचे बरेच नुकसान झाले.
परशुराम साईखेडकर नाटय़गृहासमोर दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. टिळकपथ रस्त्यावर दोन्ही बाजुंना चारचाकी वाहने उभी केली जातात. नाटय़गृहाकडील रस्त्याच्या कडेला कोणीतरी कचरा जाळला होता, असे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. पेटविलेला कचरा वाहनतळावर उभ्या असणाऱ्या अलिशान मोटारींना भस्मसात करेल असे कोणालाही वाटले नाही. पेटलेल्या कचऱ्याची धग प्रथम ‘महिंद्रा क्वांटो’ मोटारीला बसली. लगोलग तिच्या शेजारी उभी असणारी ‘मांझा’ ही मोटारही आगीच्या विळख्यात सापडली. अगदी रस्त्याच्या कडेला घडलेल्या या प्रकाराने नागरिकांची धावपळ उडाली.
शिवाजी उद्यानाकडून सांगली बँक चौकात येणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक या घटनेमुळे विस्कळीत झाली. दरम्यानच्या काळात काही जणांनी अग्निशमन दलाकडे संपर्क साधला. या दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी आग विझविण्याचे काम सुरू केले. १० ते १५ मिनिटात आग पूर्णपणे आटोक्यात आली. तथापि, तोपर्यंत दोन्ही मोटारींचे नुकसान झाले होते. महिंद्रा क्वांटो मोटारीची अवस्था तर ओळखण्यापलीकडे गेली होती. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरातील सर्व भागात रस्त्यालगत कचरा जाळण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. परंतु, ही बाब कशी धोकादायक ठरू शकते, हे या घटनेवरून लक्षात येते.
सुदैवाने आगीच्या या घटनेत मोटारीत कोणी नसल्याने जिवितहानी झाली नाही. साफसफाई करताना पालिकेचे कर्मचारी दररोज याच पद्धतीने रस्त्यालगत कचरा पेटवून देतात. मध्यंतरी काही पर्यावरणप्रेमींनी त्यास आक्षेप घेतला होता. तथापि, ना कामगारांची कार्यशैली बदलली, ना पालिकेने त्यांना तसे करण्यास प्रतिबंध केला. आजही रस्त्याच्या कडेला कचरा जाळला जातो. त्यास पूर्णपणे र्निबध घालण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा