पनवेल रेल्वेस्थानकाच्या पूर्व बाजूला सिडकोने बस डेपोची जागा दुचाकी वाहनांच्या वाहनतळासाठी दिल्याने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. नागरिकांच्या पायाभूत सुविधांसाठी जाहीर केलेले आरक्षण नागरिकांना विचारत न घेता सिडकोने का बदलले असा प्रश्न नवीन पनवेलकर विचारत आहेत. सिडकोच्या या नफेखारीच्या धोरणाविरोधात नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. पनवेल नगरपालिकेच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत यांच्या वॉर्डामधील ही समस्या नागरिकांच्या पुढाकारामुळे प्रकाशझोतात आली. दुचाकी पार्किंगचे कंत्राट स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने सुरू असल्याने या लढय़ाचे नेतृत्व करण्यास कोणताही राजकीय पक्ष पुढे येत नसून पनवेल येथील ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेने आंदोलनाचा झेंडा हाती घेतला आहे.
नवीन पनवेल बाजूकडील रेल्वेस्थानकासमोरून नवी मुंबई, मुंबईसाठी एनएमएमटी आणि एसटीच्या बस गाडय़ा धावतात. या गाडय़ांसाठी डेपोची सोय असावी यासाठी चार हजार चौ.मीटरचा भूखंड सिडकोने आरक्षित ठेवला होता. तशी तरतूद सिडकोने विकास आराखडय़ात करण्यात आली होती, अशी माहिती ज्येष्ठ नागरिक प्रकाश विचारे यांनी दिली. त्यापैकी निम्याहू्न अधिक जागा सिडकोने दुचाकी पार्किंगसाठी वळविली. तेथील भोवतालची जागेत बसगाडय़ा फिरवून सिडकोने बसगाडय़ा येण्याजाण्यासाठी पर्याय ठेवला आहे.
अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाने हा प्रश्न सिडकोच्या माहितीच्या अधिकारात निकाली काढण्याची मागणी केली. येथे प्रतिसाद न मिळल्याने त्यांनी महिन्याभरापूर्वी सिडकोचे  व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्याकडे निवेदन दिले. या निवेदनाला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने ज्येष्ठांनी सनदशीर मार्गाचा अवलंब करत स्मरणपत्राचा पाठविण्याचा मार्ग धरला आहे. त्यानंतरही सिडकोने बसडेपोच्या जागेतून डेपो सुरू न केल्यास उपोषणाच्या गांधीगिरीच्या मार्गाने आपला लढा देणार आहेत, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा