कुटुंबीय व खात्यातील सहकारीही हवालदिल
उत्तराखंडातील जलप्रलयात बेपत्ता झालेल्या विदर्भातील दोन महिला अधिकाऱ्यांचा अजूनही ठावठिकाणा लागत नसल्याने त्यांचे कुटुंबीय व खात्यातील सहकारी हवालदिल झाले आहेत. तेथील मदतकार्यावर लक्ष ठेवून असलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनीसुद्धा आता शंका व्यक्त करायला सुरुवात केली आहे.
येथील जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी स्मिता पौनीकर, तसेच गोंदियाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी हेमलता बावनकर गेल्या १६ जूनपासून उत्तराखंडमधील केदारनाथहून बेपत्ता आहेत. या दोघींसोबत विनोद व आरती खुरसनकर, प्रदीप व स्वरूपा गुल्हाने आणि त्यांचा पाच वर्षांचा मुलगासुद्धा याच दिवसापासून बेपत्ता आहेत. हे सातही जण चारधाम यात्रेसाठी विदर्भातून गेले होते. दिल्लीला पोहोचल्यावर त्यांनी एक टॅक्सी भाडय़ाने घेतली होती. या टॅक्सीचा चालकसुद्धा १६ जूनपासून बेपत्ता आहे. याच दिवशी या सर्वानी केदारनाथचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी घरी दूरध्वनी केला होता. रात्री आलेल्या महापुरानंतर या सर्वाशी संपर्क तुटला. या सातही जणांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती दोनदा उत्तराखंडला जाऊन आल्या आहेत.
महाराष्ट्रातील पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी शासनाच्या वतीने तेथे गेलेले सनदी अधिकारी विकास खारगे यांनीही या दोन्ही महिला अधिकाऱ्यांचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. स्मिता पौनीकर यांचे बंधू डॉ. नितांत पौनीकर दिल्लीला पशुसंवर्धन खात्यात आहेत. तेसुद्धा दोनदा उत्तराखंडला जाऊन आले. पण या सातही जणांविषयी कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. या राज्यात सुरू असलेले मदत व बचाव कार्य आता अखेरच्या टप्प्यात आले आहे. आज लष्कराने सर्व पर्यटकांना बाहेर काढण्यात आल्याचे जाहीर केल्याने पौनीकर व बावनकर कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे. आठ दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला एक संदेश पाठवून या सर्वाचा शोध लागला, असे कळवले होते. त्यामुळे कुटुंबीयांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. मात्र हा संदेश चुकीचा असल्याचे नंतर चौकशीदरम्यान स्पष्ट झाले. आता मदतकार्य जवळजवळ संपले असले तरी नागपूर व चंद्रपूरच्या जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अजूनही या सर्वाचा शोध घेणे सुरूच ठेवले आहे. शोध सुरू असला तरी आता अधिकारीच या सर्वाविषयी शंका व्यक्त करू लागले आहेत.
स्मिता पौनीकर यांचे बंधू तुषार पौनीकर यांच्याशी संपर्क साधला असता अजूनही आम्ही आशा सोडलेली नाही, असे ते म्हणाले. लष्कराने मदतकार्य संपल्याचे जाहीर केले असले तरी चारधाम परिसरातील दुर्गम भागात अनेक पर्यटक अडकलेले आहेत, अशी माहिती मिळत असल्याने या सर्वाच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.
उत्तराखंडला गेलेल्या विदर्भातील दोन महिला अधिकारी अद्याप बेपत्ता
कुटुंबीय व खात्यातील सहकारीही हवालदिल उत्तराखंडातील जलप्रलयात बेपत्ता झालेल्या विदर्भातील दोन महिला अधिकाऱ्यांचा अजूनही ठावठिकाणा लागत नसल्याने त्यांचे कुटुंबीय व खात्यातील सहकारी
First published on: 03-07-2013 at 08:58 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two womens officer that went in uttarakhand are missing