एम. एस्सी. चे शिक्षण घेण्यास घरच्यांकडून होत असलेल्या विरोधामुळे विमनस्क अवस्थेत उड्डाणपुलावरून उडी मारून आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवतीला वेळीच तेथे धाव घेत दोन युवकांनी परावृत्त केले. या समयसूचकतेबद्दल पोलीस ठाण्यातर्फे या दोन तरुणांचा खास सत्कार करण्यात आला.
शहरातील एका महाविद्यालयात ही युवती बी. एस्सी. विशेष प्रावीण्यात उत्तीर्ण झाली. तिला पुणे येथे एम. एस्सी. चे शिक्षण घ्यायचे होते. मात्र, तो खर्च झेपणारा नसल्याने तिच्या घरच्यांनी यास विरोध केला. परंतु त्यामुळे ही युवती हताश झाली व तशा अवस्थेतच आपले जीवन संपवून टाकावे, असा टोकाचा विचार करून तिने उड्डाणपूल गाठला. तेथे खाली उडी मारण्याच्या प्रयत्नात असतानाच तेथून जात असलेल्या केतन पडवळ व अमित माने (रुईभर, तालुका उस्मानाबाद) या युवकांनी वेळीच धाव घेत या युवतीला पकडले व नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. या दोन तरुणांच्या प्रसंगावधानाने युवतीचे प्राण वाचले. दरम्यान, युवतीला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केल्याबद्दल शिवाजी पोलीस ठाण्यात उपअधीक्षक तिरुपती काकडे व दीपाली घाडगे यांच्या हस्ते या तरुणांचा सत्कार करण्यात आला. युवतीच्या वडिलांना बोलावून युवतीस त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

Story img Loader