दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर जागे झालेल्या मुंबई पोलिसांनी काही सट्टेबाजांसह अभिनेता विंदू आणि चेन्नई सुपर किंग्जचा मालक गुरूनाथ मय्यपन याला अटक केली खरी. पण अनेक प्रश्न अनुत्तरीत असताना तसेच मोठे घबाड लागण्याची शक्यता असतानाही पोलिसांनी आता यू टर्न घेतला आहे. पोलिसांनी अनेक मुद्दय़ांवर मौन बाळगले तर
काहीं तांत्रिक बाबींचा आधार घेत घूमजाव
केले आहे.
विंदूच्या जबानीत बरीच माहिती बाहेर आली. पोलिसांनी विंदूची पोलीस कोठडी तब्बल चार वेळा वाढवून घेतली. पण त्याच्या चौकशीतून केवळ गुरुनाथ मय्यपनला अटक करण्यात आली. त्यातून निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे पोलीस देऊ शकलेले नाहीत.
बॉलिवूड सेलिब्रेटींना अभय का?
विंदू जॅक नावाने सट्टा घेत होता. बॉलिवूडचे काही अभिनेते त्याच्याकडे सट्टा लावत होते. हे खुद्द सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांनी सांगितले होते. या कलावंताच्या नावांबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. आता मात्र असे कुणी कलावंत नव्हतेच, असा पावित्रा पोलिसांनी घेतला आहे. आधी पोलिसांनी सांगितलेली माहिती खोटी होती की आता पोलीस सांगतात ते खोटे आहे, असा प्रश्न त्यातून निर्माण झाला आहे.
त्या सेक्स रॅकेटचे काय झाले?
विंदू आणि मय्यपनच्या संभाषणात अनेक व्यवहारांची माहिती पोलिसांना मिळाली होती. मुली पुरवणे आणि त्याबाबतच्या अश्लील संभाषणाची नोंद पोलिसांना आढळली होती. पण मुली पुरवणे, मुलींची देवाणघेवणा करणे हे कायदेशीरदृष्टय़ा सिद्ध करणे कठीण आहे आणि ते कुठल्याही गुन्ह्य़ाच्या कक्षेत येत नसल्याचे पोलीस सांगतात. त्यामुळे याबाबत काहीही कारवाई होणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आयपीएल सट्टेबाजीच्या व्यवहारात मुलींची देवाणघेवाण होते किंवा बडय़ा सेलिब्रेटी मुलींचा शौक बाळगतात ही बाब कायदेशीर चौकटीत येत नसल्याने याबाबतीत त्यांना अभय मिळणार आहे. त्यामुळे याप्रकरणात गुंतलेल्या मॉडेल्स आणि मुलींची नावे समोर येणार नाहीत.
विंदूची पोपटपंची सुरूच
जामीनावर बाहेर पडलेल्या विंदूने प्रसारमाध्यमांना मुलाखती देण्याचा धडाका लावला आहे. ‘तो मी नव्हेच’ असा पवित्रा घेणाऱ्या विंदूने सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला. सगळ्या राजकारण्यांची मुले सट्टा लावतात. त्यांना का पकडत नाही, असा जाहीर सवाल त्याने केला. पोलीस कोठडीत राहून आलेला विंदू बाहेर येताच अशा आरोपांच्या तोफा झाडत असल्याने पोलिसांचा वचक होता की नाही, असा प्रश्न पडला आहे. कसलेला गुन्हेगारपण एवढे धाडस करत नाही, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
दिल्ली पोलीसच सरस
मुंबईत येऊन तीन खेळाडूंना अटक करणारे दिल्ली पोलीसच या प्रकरणात सरस ठरल्याचे दिसत आहे. दिल्ली पोलिसांनी खेळाडूंच्या अटकेनंतर त्यांना मोक्का लावला. मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या रमेश व्यास यालाही ते घेऊन गेले. तर दिल्ली पोलिसांकडून मुंबई पोलिसांनी टिंकू या सट्टेबाजाला आणले. पण एका प्रकरणात दोन गुन्हे दाखल करता येत नसल्याचे सांगत त्याच्याविरूद्ध अजून पुरावेच शोधण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिल्ली पोलीस तर राज कुंद्रापर्यंत पोहोचले असताना मुंबई पोलीस मात्र थंड होत चालल्याचे दिसत आहे. आमच्या प्रकरणातले सट्टेबाज देशाबाहेर पळाले आहेत. ते आल्यावरच पुढची कारवाई करू, असे उत्तर पोलिसांकडून मिळत आहे.
आमचे लक्ष सट्टेबाजीवरच आहे. सेलिब्रेटी आणि मॉडेल्स आमचे टार्गेट नव्हे, असे सुरवातीपासूनच पोलीस सांगत होते. चौकशीकरताही बडय़ा खेळाडू आणि सेलिब्रेटींना आणण्याचे धाडस पोलिसांनी दाखवले नाही. त्याचे कारण काय ते पोलीस आणि त्या संबंधितांनाच माहीत. एकंदरीत मुंबई पोलिसांकडून आता मोठे काही घबाड मिळण्याची आशा धूसर असून यू टर्न सुरू झालेला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा