आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीला धडा शिकविण्यासाठी मतदार जनता आसुसलेली असून त्याविरोधात शिवसेना-भाजप-रिपब्लिकन पक्षाच्या महायुतीत मनसेनेही सहभागी व्हावे म्हणून आपले प्रयत्न सुरूच असल्याचे, रिपाइं नेते रामदास आठवले यांनी सांगितले.
आठवले हे सोलापूर जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर असताना करमाळा येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेला जवळ करण्याबाबत स्पष्ट शब्दात टोकले असले तरी आठवले यांनी त्याकडे दुर्लक्ष करून आपली भूमिका पुढे रेटण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसून येते.
ते म्हणाले,‘‘मनसेने महायुतीत सहभागी होण्यासाठी टाळी दिली आहे. मनसेसह सर्व विरोधक एकत्र आले तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे बारा वाजणार यात शंका घेण्याचे कारण नाही. शिवसेना व मनसे एकत्र येण्यासाठी उद्धव व राज यांनी एकमेकास टाळी द्यावी, अशी तमाम जनतेची इच्छा असल्याचे आठवले यांनी नमूद केले. उद्धव व राज ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी आपले प्रयत्न चालूच असून येत्या काही दिवसात दोन्ही बंधूंमध्ये एकोपा झाल्याचे दिसेल,’’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस व राष्ट्रवादीने फसविल्यामुळेच रिपाइंने शिवसेना-भाजप युतीशी दोस्ताना केला आहे. हा दोस्ताना आगामी काळात आणखी मजबूत होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आपण लोकसभा लढवायची की राज्यसभेवर जायचे, याचा निर्णय अद्याप घेतला नाही. निवडणुकीच्या तोंडावर परिस्थिती पाहून यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही आठवले यांनी स्पष्ट केले. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुन्हा दुसऱ्यांदा उभे राहिले तर आपण त्यांच्या विरोधात उभे राहणार नाही. कारण आपणास पराभूत व्हायचे नाही. पराभूत न होता विजय मिळविण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची भूमिका आहे, असे ते मिस्किलपणे म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा