ऊर्जा युवा प्रतिष्ठान आणि सावरकर साहित्य अभ्यास मंडळ यांच्यातर्फे १५ ते १७ मार्च या कालावधीत येथे रौप्य महोत्सवी स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्य व सावरकर साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांची निवड करण्यात आली आहे.
सावरकर साहित्य आणि त्यांच्या विचारांची नव्या पिढीला ओळख करून देण्याच्या उद्देशाने सावरकर अभ्यास मंडळाच्यावतीने १९८४ पासून सावरकर साहित्य संमेलनाची संकल्पना यशस्वीपणे राबविली जात आहे. रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन सावरकर यांची जन्मभूमी भगूर आणि कर्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये यशस्वी करण्याचे दायित्व ऊर्जा युवा प्रतिष्ठानने स्वीकारले आहे. या निमित्ताने, सावरकर विचारांचा महोत्सव घडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक अजय बोरस्ते यांनी नमूद केले. गंगापूर रस्त्यावरील चोपडा लॉन्सवर होणाऱ्या या संमेलनस्थळास ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहित्य नगरी’ असे नांव देण्यात येणार आहे.
शुक्रवारी १५ मार्चला दुपारी चार वाजता अभिनव भारत स्मारकापासून शोभायात्रा व ग्रंथदिंडी काढण्यात येईल. त्यात सावरकर साहित्यांचे दर्शन घडविणारे चित्ररथ असतील. शहरातील प्रमुख मार्गावरून ही यात्रा संमेलनस्थळी जाईल.
सायंकाळी सहा वाजता उद्घाटन होईल. या सोहळ्यास २४ व्या सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर तसेच अभिनेते शरद पोंक्षे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी स्वा. सावरकरांचा जीवनपट (एक धगधगते अग्निकुंड), साहित्यिक सावरकर, सावरकर आणि गुप्तहेर यंत्रणा, सावरकर आणि हिंदुस्तानची संरक्षण सिद्धता, सावरकरांच्या वाटेवर चालतांना या विषयावर सत्र आणि सायंकाळी ‘जयोस्तुते’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल.
रविवारी सावरकरांचा राष्ट्रवाद, स्वा. सावरकर हिंदुत्ववादी का बनले ?, विज्ञाननिष्ठ सावरकर, तरूणांचे प्रेरणास्थान – स्वा. सावरकर या विषयावर सत्र होणार असून सायंकाळी पाच वाजता संमेलनाचा समारोप होणार आहे.
वेगवेगळ्या नऊ सत्रांमध्ये दिलीप करंबेळकर, डॉ. शुभा साठे, शेषराव मोरे आणि वा. ना. उतपाद यांच्यासह इतर मान्यवर सहभागी होणार आहेत. रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन संस्मरणीय करण्यासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बोरस्ते व मंडळाचे अध्यक्ष शंकरराव गोखले यांनी केले आहे.
सावरकर साहित्य संमेलनाचे उद्धव ठाकरे उद्घाटक
ऊर्जा युवा प्रतिष्ठान आणि सावरकर साहित्य अभ्यास मंडळ यांच्यातर्फे १५ ते १७ मार्च या कालावधीत येथे रौप्य महोत्सवी स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्य व सावरकर साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांची निवड करण्यात आली आहे.
First published on: 12-03-2013 at 04:22 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray inaugurates savarkar sahitya sammelan