तापमान दिवसेंदिवस वाढत असताना शहर व जिल्ह्याचे राजकीय वातावरणही प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभांमुळे चांगलेच तप्त होऊ लागले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची २० एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी आता पाच मे हा दिवस ठरला असून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उध्दव हे प्रथमच जळगावी येत असून राज्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर त्यांचा हा दौरा असल्याने या सभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
उद्धव यांची सभा प्रथम एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात जळगाव येथे होण्याचे निश्चित झाले होते. तथापि, काही कारणास्तव सभा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आमदार चिमणराव पाटील यांच्या पारोळा गावात पाच मे रोजी उध्दव यांची सभा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु सभा गर्दीच्या दृष्टिने यशस्वी करण्यासाठी जळगाव येथेच ती घेण्यात यावी यावर काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भर दिला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण २० एप्रिल रोजी जळगावमध्ये येत असून तेही शहरातच सभा घेण्याची शक्यता असताना मग उद्धव यांचीही सभा येथेच झाली पाहिजे असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. जळगाव हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे लोकांना येणे सहजशक्य होते. त्यामुळे पदाधिकारी, आजी-माजी आमदार यांनी सभा स्थळाबाबत आग्रहाची भूमिका घेऊ नये, असे मत त्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. त्यानुसार सर्वानी मतभेद बाजूला ठेऊन ही सभा जळगाव येथेच घेण्याचे निश्चित करण्यात आले.
शहरातील सागर पार्क मैदानावरच ही जाहीर सभा होणार असून त्यादृष्टिने तयारी सुरू झाली आहे. राज ठाकरे यांच्या सभेला येथे मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता उद्धव यांचीही सभा तेवढीच यशस्वी करून दाखविण्याचे आव्हान शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांसमोर आहे. राज यांनी आपल्या भाषणात स्थानिक मुद्यांवर कोणतेच मत व्यक्त न केल्याने उध्दव यांच्याकडे जाहीर सभेत स्थानिक समस्या मांडण्याची आयतीच संधी आली आहे. स्थानिक शिवसेना आमदार सुरेश जैन हे घरकुल घोटाळ्या प्रकरणी एक वर्षांपासून अधिक काळापासून न्यायालयीन कोठडीत आहेत.
हे प्रकरण न्यायालयीन असल्याने उध्दव टाकरे या विषयावर कोणती भूमिका मांडतात, हे महत्वपूर्ण ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा