शिर्डीत शिवसैनिक कार्यकर्ता प्रशिक्षण मेळाव्यात झालेल्या हाणामारीची शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासदंर्भात आज सकाळीच संबंधीत पदाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईत शिवसेना भवनावर बोलावून घेण्यात आले आहे.
उत्तर नगर जिल्ह्याचा कार्यकर्ता प्रशिक्षण मेळावा नुकताच शिर्डीला आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात व्यासपीठावर बसण्यावरुन मेळाव्याचे आयोजक व तालुकाप्रमुख कमलाकर कोते आणि नानक सावंत्रे यांच्यात वाद झाला. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले होते. यावेळी मध्यस्थी करण्यास गेलेले शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे व शिर्डी शहरप्रमुख सचिन कोते यांनाही दगडाचा प्रसाद मिळाला होता. या हाणामारीत नानक सावंत्रे जखमी झाले होते.
खेवरे यांच्या मध्यस्थीमुळे त्यावेळी या वादावर तात्पुरता पडदा पडला, मात्र मेळावा तणावात पार पडला. दरम्यान माध्यमांमधून या घटनेला प्रसिद्धी मिळाल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रावसाहेब खेवरे, कमलाकर कोते व सचिन कोते यांना आज सकाळीच तातडीने मुंबईस बोलावून घेतले. दुपारनंतर शिवसेना भवनात या तिघांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख सुहास सामंत, अनिल तुपे आदी उपस्थित होते. या वृत्ताला खेवरे यांनी दुजोरा दिला, बैठकीतील चर्चेची माहिती देण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

Story img Loader