राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात दुष्काळाचे संकट ओढवले असताना त्यावर शिवसेना केवळ राजकारण करीत न बसता ‘गंभीर दुष्काळ-खंबीर शिवसेना’ हे ब्रीदवाक्य घेऊन दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. येत्या ११ व १२ मे रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्य़ाच्या भेटीवर येत आहेत. त्याचे औचित्य साधून १२ मे रोजी सोलापुरात ठाकरे यांच्या हस्ते दुष्काळग्रस्त भागासाठी तीनशे पाण्याच्या टाक्या, दहा टँकर व दोन रुग्णवाहिका अर्पण केल्या जाणार आहेत.
१२ मे रोजी सकाळी ८.३० वाजता चार हुतात्मा पुतळ्यांजवळ ठाकरे यांच्या हस्ते दुष्काळग्रस्तांसाठी पाणीटाक्या, टँकर व रुग्णवाहिका अर्पण केल्या जाणार आहेत. तत्पूर्वी, ११ मे रोजी उस्मानाबाद जिल्ह्य़ातील परांडा येथे ठाकरे यांची जाहीरसभा आयोजित करण्यात आली आहे. ही जाहीर सभा आटोपल्यानंतर सायंकाळी ते सोलापुरात मुक्कामासाठी येणार आहेत.
दरम्यान, उध्दव ठाकरे यांचा सोलापूर व उस्मानाबाद दौरा यशस्वी होण्यासाठी सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरूरकर यांनी सेनेचे स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक घेतली. या बैठकीला सेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे, सोलापूर विभागाचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, सोलापूर शहरप्रमुख प्रताप चव्हाण, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार शिवशरण पाटील आदींची उपस्थिती होती.