तुळजाभवानी देवीच्या नवरात्र महोत्सवासाठी राज्यातील सार्वजनिक नवरात्र मंडळांच्या भवानीज्योत तुळजापुरात मोठय़ा संख्येने दाखल होत आहेत. विदर्भातील सर्वाधिक भवानीज्योत गेल्या दोन दिवसांपासून येथून प्रस्थान करीत आहेत.
श्री तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रोत्सव घटस्थापनेने (शनिवारी) सुरू होत आहे. विदर्भासह राज्यातील, तसेच कर्नाटकातील बीदर, गुलबर्गा, भालकी, हुमनाबाद, जहिराबाद येथून युवक मंडळ व नवरात्र मंडळांचे जत्थे तुळजापुरात दाखल होत आहेत. ‘आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो’च्या गजरात तुळजाभवानी गाभाऱ्यातील नंदादीपाला भवानीज्योत प्रज्वलित करून भवानीपुजा बांधली जात असल्याचे चित्र आहे. तरुणांची मोठी गर्दी या निमित्ताने लोटत असून घटस्थापनेच्या मध्यरात्रीपर्यंत हे चित्र कायम राहणार आहे. दरम्यान, तुळजापुरात भाविकांना सोयी देणारे स्टॉल अजून सुरू न झाल्याने तरुणांना त्याचा फायदा घेता येत नाही.
शिवसेनेचे शहरप्रमुख सुधीर कदम व मनसेचे जिल्हा सचिव अमर परमेश्वर यांनी अनेक मंडळांना सुविधा पुरविल्या. शिवाजी चौकातही मंडळांकडून जल्लोष साजरा झाला. कर्नाटकातील पायी येणाऱ्या भाविकांचाही ओघ नळदुर्ग मार्गावरून आठ दिवसांपासून सुरू आहे. अनवाणी चालणाऱ्यांमध्ये महिलावर्गाचे प्रमाण लक्षणीय आहे.
अनुदानाचे एक कोटी लटकलेलेच!
दरम्यान, तुळजाभवानी देवीची सर्वात मोठी यात्रा हाताळण्यासाठी तुळजापूर नगरपालिकेकडे दमडीही नसल्याने सत्ताधारी व पालिका प्रशासन हातात-हात बांधून काय करायचे, या चिंतेत आहेत. मागील वर्षी पार पडलेल्या यात्रा अनुदानाची एक कोटीची रक्कम अजून न मिळाल्याने मागील यात्रा काळातील बिले अजूनही अदा झाली नाहीत. तुळजाभवानी नवरात्र महोत्सवाची तयारी करण्यासाठी अनेक बठका झाल्यानंतर व उत्सव जवळ येऊन ठेपला असताना मागील एक कोटी खर्चाची रक्कम पालिकेला अजून मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती सोमवारी नगराध्यक्षा विद्याभाभी गंगणे, मुख्याधिकारी डॉ. संतोष टेंगळे, नगरसेवक पंडित जगदाळे, युवा नेते विनोद गंगणे यांच्याकडून मिळाली. पालकमंत्री मधुकर चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी यात्रेबाबत अनेक बठका घेऊन तयारीचे आदेश दिले. मात्र, राज्य सरकारकडून मिळणाऱ्या एक कोटी अनुदानाची रक्कम न मिळाल्याने पालिकेसमोर खर्चाबाबत मोठाच पेचप्रसंग उभा ठाकला आहे. मागील वर्षीच्या खर्चाची बिले अदा केल्याशिवाय चालू काम कसे करायचे, असा युक्तिवाद दुपारी पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात सुरू होता. प्रशासन व पदाधिकारी यांच्याकडून गुत्तेदारांना वैयक्तीक हितसंबंधाचा दुजोरा देऊन वेळ भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा